Crime News : दारू तस्करी करणारी महिला अटकेत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

liquor smuggling women arrested by rpf crime branch nagpur

Crime News : दारू तस्करी करणारी महिला अटकेत!

नागपूर : रेल्वेतून दारूची तस्करी करणाऱ्या महिलेला आरपीएफ गुन्हेशाखेने अटक केली. आरोपी महिला पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी एका कोचमधून दुसऱ्या डब्यात चढत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

राणी गब्बर (४३), रा. वर्धा असे आरोपी महिलेचे नाव आहे. ही कारवाई आज (ता. २०) सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली. गुन्हेशाखेचे पथक सोमवारी सकाळपासूनच गस्तीवर होते. तस्कर महिलेने पांढुर्णा, मध्यप्रदेश येथून दारू खरेदी केली.

दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेसने ती वर्धेसाठी निघाली. तिच्याकडे रेल्वेचे तिकीट नव्हते. त्यामुळे ती शौचालयाजवळ बसली होती. प्रवासादरम्यान आपल्यावर पोलिसांची नजर आहे, अशी भीती तिला वाटली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच ती स्लीपर कोच मधून उतरली.

तिच्या जवळ एक ट्राली बॅग, एक वजनी स्कूल बॅग होती. तसेच तिने संपूर्ण चेहरा कापडाने झाकलेला होता. ती जनरल कोच मध्ये चढण्याच्या प्रयत्नात होती. चेहरा झाकल्याने पथकाला संशय आला. पोलिसांनी महिलेची विचारपूस केली.

मात्र, तिने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे संशय अधिकच बळावला. तिच्याकडील दोन्ही बॅगची झडती घेतली असता त्यात २८ हजार रुपये किंमतीच्या ३८२ बाटल्या आढळल्या. गुन्हेशाखेत आणून तिची चौकशी केली.

गुन्हेशाखेच्या चौकशीत ही महिला बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूची तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले. कायदेशीर कारवाई नंतर संपूर्ण मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन प्रसाद सिंग यांच्या मार्गदर्शनात आरक्षक जसवीर सिंह, सागर लाखे, अजय सिंह यांनी केली.