
बारावी निकालात नागपूर राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल
नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाद्वारे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्य निकालात नागपूर विभागाने गेल्यावर्षीच्या सहाव्या स्थानावरुन झेप घेत ९६.५२ टक्क्यासह राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. विभागात ९७.३७ टक्क्यासह गोंदिया जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. तसेच यंदाही मुलीनी मुलाच्या तुलनेत निकालात बाजी मारली आहे.
बारावी परीक्षा ४ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होम सेंटरवर घेण्यात आली होती. यामध्ये विभागातून १ लाख ६० हजार २८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ५९ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ५३ हजार ५८४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यावेळी ऑफलाइन पद्धतीने झालेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय विद्यार्थ्यांना अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला होता. त्यातून निकालाचे प्रमाण यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर निकालाची घोषणा करण्यात आली होती हे विशेष.
आज सकाळी निकालाची घोषणा झाल्यावर त्यात ९६.५२ टक्क्यासह नागपूर विभागाने राज्यात दुसरे स्थान पटकाविले. विभागनिहाय विचार केल्यास गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९७.३७ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.३१ टक्के तर सर्वात कमी कला शाखेचा निकाल ९३.४२ टक्के लागला आहे.
१७ जूनला मिळणार गुणपत्रिका
बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १७ जूनला त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी १० ते २० जूनपर्यंत मुभा देण्यात आली आहे. छायांकित प्रतीसाठी २९ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारासाठी २ संधी देण्यात येणार आहे.
विभागाची स्थिती
एकूण नोंदणी- १,६०,०२८
परीक्षा देणारे विद्यार्थी १,५९,१०६
उत्तीर्ण विद्यार्थी - १,५३, ५८४
एकूण -टक्केवारी - ९६.५२
विभागानिहाय निकाल
गोंदिया - ९७. ३७
भंडारा - ९७.३०
नागपूर - ९६. ६५-
चंद्रपूर -९६.१०
गडचिरोली - ९६.००
वर्धा - ९५.३७
नागपूर शाखानिहाय निकाल
विज्ञान- ९९.३१
वाणिज्य - ९५.७८
कला - ९३.४२
एमसीव्हीसी - ९५.०३
मुले - ९५.६२
मुली - ९७.४७
Web Title: Maharashtra Hsc Result 2022 Nagpur State Second
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..