मोठी बातमी: नागपूरच्या पालकमंत्र्यांनी थेट राज्यपालांवर केले गंभीर आरोप.. कुलगुरुंच्या RSS कनेक्शनवर आक्षेप   

Minister Nitin Raut taken objection on Vice Chancellor of Nagpur university
Minister Nitin Raut taken objection on Vice Chancellor of Nagpur university

नागपूर :  राज्यात महाआघाडीचे सरकार असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ‘स्वयंसेवक' कसा काय नेमण्यात आला असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केला. एवढेच नव्हे तर त्यांनी राज्यपालांवर अधिकाराचा दुरुपयोग केला असल्याचा आरोपही केला.

अलीकडेच नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियुक्ती केली. डॉ. चौधरी यांनी नियुक्ती होताच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांचे आभारी मानले. हीच बाब महाआघाडीच्या नेत्यांना खटकली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये याकरिता राज्य शासनाने कुलगुरु यांची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहे. 

याचाच फायदा कोश्यारी यांनी घेतला. त्यांनी संघ वतुर्ळातील स्वयंसेवकाची या पदावर नेमणूक केली. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आघाडीत सहभागी असलेल्या घटकपक्षांचे आहेत. त्यामुळे कुलगरुपदी नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचे मत घेण्याचेही सौजन्य राज्यपालांनी दाखवले नाही, असा आरोप मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितीन राऊत यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणने एकूण घेतले, मात्र त्यांनी या विषयावर तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे समजते.

नागपूरच्या कुलगुरुपदासाठी १३४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून ३० जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. यातून अंतिम पाच जणांची निवड करून त्यांची राज्यपालांनी प्रत्यक्ष मुलाखत घेतली होती. यात डॉ. विनायक देशपांडे, इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ. सुनील भागवत, नांदेडचे डॉ. गणेशचंद्र शिंदे, नॉर्वेचे डॉ. मोहनलाल कोल्हे यांचा यात समावेश होता. विद्यमान कुलगुरु डॉ. चौधरी यांच्या पेक्षा इतर उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता अधिक होती. भागवत आणि कोल्हे यांचे नाव यात आघाडीवर होते.

शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणू नये अशीच भूमिका आपली आहे. मात्र नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती करताना राज्यपालांनी ‘विशेष' संघटनेचा विचार केला. त्याकरिता अधिकाराचा दुरुपयोग केला. त्यामुळे आपण थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.
-नितीन राऊत,
पालकमंत्री, नागपूर  

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com