
Nagpur : महापुरुषांची झोपडी सरकारी अधिकाऱ्यांनी तोडली, ‘त्या’ फकिराने रस्त्यावरच फुलविली विचारांची बाग
नागपूर : ‘झोपडी’ हा शब्द उच्चारताच मनात किळसवाणे भाव येतात. परंतु ही झोपडी याला अपवाद होती. या झोपडीत गांधी-नेहरू, फुले-आंबेडकर यांच्यापासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा हे सारेच महापुरुष एकत्र नांदत होते.
मात्र ही रस्त्यावरची झोपडी सरकारी अधिकाऱ्यांनी तोडली. त्यामुळे डोक्यावरच छत गेलं. मात्र या झोपडीत राहणाऱ्या कफल्लक फकिराने महापुरुषांच्या विचारांची बाग आता रस्त्यावरच फुलविली असून वैचारिक सुंगध पेरण्याचे त्यांचे काम सुरुच आहे.
मोहन परमा कोरी, असे या अवलियाचे नाव. वयाची साठी उलटलेली. वाढलेली व पिकलेली दाढी. गुडघे गेले, आता रिक्षा चालवणं होत नाही. त्यामुळे आता जगण्यासह निवाऱ्याचाही नवा पेच त्यांच्यासमोर उभा आहे, मात्र अशाही स्थितीत त्यांच्यासोबत क्षणभर उभं राहील की, स्मित हास्य करीत ते स्वागत करतात.
जयताळ्याच्या दिशेने जाणाऱ्या लंडन स्ट्रीट मार्गावर ही एकटीच झोपडी होती. या झोपडीच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ. झोपडीच्या अंगणात तुळशी वृंदावन. बाजूलाच फुलांची झाडं. या फुलझाडांना जगवण्यासाठी मोहन पाचशे मीटरवरून पाणी आणत होते. उन्हाळ्यातही त्यांनी बाग कधी सुकू दिली नाही.
झोपडीत बहुतेर सर्वच महापुरुषांचे फोटो होते. आजूबाजूला महापुरुषांचे सुविचार ठळक अक्षरात दिसत होते. ज्या महापुरुषाचा दिवस असेल त्या महापुरुषाचा फोटा बाहेर लावून त्यांची जयंती-पुण्यतिथी ते एकटेच साजरे करत होते. मात्र या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले. सरकारी अधिकाऱ्यांनी नोटीस दिली.
झोपडी तोडली, मात्र या फकीरबाबांनी तोंडातून ब्र शब्द काढला नाही. जमीन सरकारची आहे, माझं काही नाही. आता येथे अर्धवट सिमेंटीकरण झाले आणि पुन्हा याच ठिकाणी महापुरुषांच्या विचारांचे फलक त्यांनी लावले. रात्र उघड्यावर काढतात. वादळ वारा आला की, बाजूला कापडं बाधूंन राहतात. झोपडी तुटल्याचे दुःख नाही, सरकारी अधिकाऱ्यांनी नियम पाळले, असे ते बोलून जातात.
गतिमंद मुलाचा विरह
मोहन परमा कोरी यांना आई, वडील, बहिणी असा भरला परिवार होता. परंतु आता सारं संपलं. आई-वडील नाहीत. बहिणी आपल्या घरी गेल्या. खासगीतील आयुष्य सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते म्हणता भाऊ, आयुष्य आहे तेथे दुःख असेलच. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील. वडील नागपुरात रेल्वेत होते.
लग्नानंतर मोहन यांना झालेला मुलगा गतिमंद जन्माला आला, आणि पत्नीने साथ सोडली. २५ वर्षे गतिमंद राजकुमारला त्यांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं. मात्र नुकताच राजकुमारचा मृत्यू झाला. मुलगा गेल्याच्या वेदना त्यांच्या मनात घर करून आहेत. मुलाचा विषय निघताच त्यांच्या डोळ्यात पाणी येते. मळक्या शर्टने ते पुसण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करीत दुसराच विषय पुढे आणतात.
तीस वर्ष एकाच ठिकाणी झोपडी आहे. आता ती तुटली. मात्र मी येथेच राहातो. सर्व अधिकारी ओळखतात. नाव कोणाचेही माहीत नाही. अधिकाऱ्यांनी नियमात राहून त्यांचे काम केले. राष्ट्रसंत, गाडागेबाबांचा एकात्मतेचा संदेश देणारी झोपडी येथेच उभी करण्याचा विचार आहे.
-मोहन परमा कोरी