esakal | शिवसेनेचे काम घरातून केले तर खपवून घेणार नाही, चतुर्वेदींना तंबी
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

शिवसेनेचे काम घरातून केले तर खपवून घेणार नाही, चतुर्वेदींना तंबी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेना (Shivsena) कोणा एका नेत्याचा पक्ष नाही. त्यामुळे पक्षाचे काम एखाद्याच्या घरातून चालत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढे सर्व बैठका व पक्षकार्य शिवसेना भवनातच झाले पाहिजे अशा शब्दात खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी नागपूरचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी (MLA Dushyant Chaturvedi) यांना तंबी दिल्याचे समजते.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

शिवसेनेतील संतुष्ट आणि असंतुष्टांना एकत्र बसवून देसाई यांनी बुधवारी मुंबईत सर्वांचा सुमारे तीन तास क्लास घेतला. या बैठकीला चतुर्वेदी यांच्यासह रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, सूरज गोजे, राजेश कनोजिया आदी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. तत्पूर्वी, शहर कार्यकारिणीवरून अनेक महिन्यांपासून जुने आणि नव्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये वाद धुमसत होताच. माजी जिल्हा प्रमुखांना उपप्रमुख केल्याने अनेकांनी पदाचे राजीनामे दिले होत. अनेक पदाधिकारी पक्ष कार्यापासून अलिप्त होते. सावरबांधे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील नेत्यांनी नागपूरमधील घडामोडींची दखल घेत तातडीने सर्वांना मुंबईला बोलावून घेतले.

कार्यकारिणीत जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख राहिलेल्यांचे डिमोशन केले गेले. काँग्रेसमधून आयात केलेल्यांना प्रमुख केले. निष्ठावंतांना अडगळीत टाकण्यात आले. निर्णय घेताना कोणालाही विश्वासात घेतले जात नाही, शिवसेना भवनाऐवजी पक्षाचे काम घरून चालविले जाते आदी तक्रारींचा पाढाच शिवसैनिकांनी वाचून दाखवला. देसाई यांनी याबाबत संपर्क प्रमुखांना विचारणा करून खरेखोटे जाणून घेण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते.

दोन जिल्हा प्रमुख नेमणार?

ग्रामीणप्रमाणे नागपूर शहरातही दोन जिल्हा प्रमुख नेमण्याचा प्रस्ताव या बैठकीत देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून पुढचा निर्णय कळवतो असे देसाई यांनी सांगितले. शिवसेनेत जिल्हा प्रमुख महत्त्वाचे पद समजले जाते. मात्र, नागपूरमध्ये त्याऐवजी महानगरप्रमुख आणि दोन शहर प्रमुख अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

तुमाने, जयस्वाल लक्ष घाला

खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जयस्वाल यांनाही देसाई यांनी पक्ष संघटनेत लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तुम्ही खासदार, आमदार आहात. त्यामुळे संघटनेपासून अलिप्त राहून चालणार नाही. दोघांनाही विश्वासात घेऊनच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे निर्देश देसाई यांनी संपर्क प्रमुखांना दिले.

loading image
go to top