भाजपच्या ‘१२० प्लस’ला पक्षातूनच आव्हान; हेवेदावे, सुप्त स्पर्धा वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

भाजपच्या ‘१२० प्लस’ला पक्षातूनच आव्हान; हेवेदावे, स्पर्धा वाढली

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत (Municipal elections) यंदा भाजपने (BJP) ‘१२०प्लस' जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजन आणि तयारीसुद्धा जोमात सुरू आहे. दुसरीकडे अंतर्गत धुसफुस, निष्क्रिय नगरसेवकांविषयी नाराजी, नेत्यांमधील हेवेदावे आणि आपसातील सुप्त स्पर्धा याचाही सामना पक्षाला करावा लागणार आहे.

मागील निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेत्यांनी आपसात भांडून आणि एकमेकांचा पत्ता साफ करून महापालिका भाजपला दान केली होती. त्यामुळे दीडशेंपैकी १०८ जागा जिंकून भाजपने विक्रम नोंदवला. आता किमान हा आकडा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. तत्पूर्वी, विधानसभेच्या सहापैकी सहा जागा भाजपने जिंकल्या होत्या.

हेही वाचा: MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मात्र, पाच वर्षांतच उत्तर आणि पश्चिम नागपूरची जागा भाजपला गमवावी लागली. मध्य आणि दक्षिण नागपूर कसेबसे बचावले. अन्यथा मोठे भगदाड भाजपला पडले असते. काँग्रेसमधील (Congress) भांडणे पूर्णपणे संपलेली नाहीत, परंतु त्याची तीव्रता कमी झाल्याचे दिसते. राज्यातील काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे यंदा काँग्रेस लढण्याच्या मूडमध्ये आहे. ते बघता महापालिकेत (Municipal elections) पंधरा वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला चांगलीच मशागत करावी लागणार आहे.

चार सदस्यीय प्रभागपद्धतीमुळे नाराजीत आणखी भर पडली आहे. निम्म्या नगरसेवकांनी कामच केले नाही. त्याचा फटका निश्चितच भाजपला बसणार असल्याचे सध्यातरी दिसून येते. चार सदस्यांमधून निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवकांना प्रभागातील जनतेने बघितलेच नाही. त्यांच्या तक्रारी ऐकल्या नाहीत. समस्याही सोडवल्या नाही. प्रभागातील एकाच नगरसेवकांवर भार टाकून इतर तिघे फक्त नगरसेवक म्हणून मिरवत आहे.

हेही वाचा: महिनाभराने कामावर रूजू झालेल्या डॉक्टरचा खून; झाडल्या चार गोळ्या

पक्षातर्फे वारंवार इशारा आणि तिकीट कापण्याचे संकेत दिल्यानंतरही कोणी सक्रिय झाल्याचे सध्यातरी दिसत नाही. हीच टीम कायम ठेवल्यास भाजपला फटका बसल्याशिवाय राहणार नाही. थोड्याफार फरकांनी पराभूत झालेल्या विरोधी पक्षाचे माजी नगरसेवक व उमेदवारांनी ही पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे यंदा उमेदवारी देताना भाजपला चांगलीच काळजी घ्यावी लागणार आहे. आमच्या नगरसेवकांनी घाण केल्याचे भाजपचे दुसऱ्या फळीतील व निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले उमेदवारसुद्धा उघडपणे बोलत आहे. त्यामुळे यंदा पक्षाने उमेदवारी दिली तर कसे होणार याची चिंता अनेकांना सतावत आहे.

जो जनतेत, त्याला उमेदवारी

उमेदवारी देण्यापूर्वी सर्वे केला जाईल. जो जनतेत असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. मात्र, भाजपची पूर्ण तयारी सुरू आहे. बूथ कमिट्यांपासून पालक कमिटीच्या बैठकी आटोपल्या आहेत. देवेंद्र फडणवीस प्रत्येक बूथ फिरले. आमदारही तयारीला लागले आहेत. पंधरा वर्षांत भाजपने केलेली कामे जनतेपुढे आहे. इतर शहराच्या तुलनेत शहर कसे आणि किती बदलेले सर्वांच्या डोळ्यांनी दिसत आहे. ते सांगायची गरज नाही. त्यामुळे ‘१२०’चा आकडा गाठणे भाजपला (BJP) अवघड नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpNagpurCongress
loading image
go to top