
12 Th Result Nagpur : काळ भयंकर होता पण ‘ती’ची इच्छाशक्ती दुर्दम्य! बारावीत घवघवीत यश
नागपूर - आई-वडील बाहेरगावी कामावर असल्याने ‘ती’ लहानपणी आजोबांकडे राहूनच शिकत होती. मात्र, एक दिवस आजोबानेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने ती मानसिकदृष्ट्या खचली. तणावात राहू लागली. तिच्या या परिस्थितीची माहिती मिळताच, एका सेवाभावी संस्थेने तिला नागपुरात आणले. संस्था आणि शाळेच्या मदतीने तिने आपल्यावरील ओढविलेल्या प्रसंगातून सावरत बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने तानिया(बदललेले नाव)चे आईवडील तिला आजोबाच्या भरोश्यावर सोडून मुंबई येथे काम करण्यास निघून गेले. एकामागून एक दिवस निघून जात असताना ती वयात येत होती. एक दिवस आजोबाने जे करायला नको ते करण्याचा प्रयत्न केला. आजोबांनीच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने या भयंकर प्रसंगाने ती पुरती कोलमडली. तेव्हा ती सातव्या वर्गात शिकत होती.
एका सेवाभावी संस्थेला तिच्या या परिस्थितीची माहिती मिळाली. त्यांनी तिला शिक्षणासाठी नागपुरात आणले. येथील एका शाळेत तिचा प्रवेश झाला. अत्यंत हुशार असलेल्या तानियाला शिक्षणाची ओढ होती. मात्र, ओढवलेला प्रसंग मनाला डागण्या देतच होता.
ती तणावात राहायची शिक्षणात तिचे मन लागत नव्हते. पण शाळेने तिचा तणाव कमी करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. त्यातून दहावी आणि आता बारावीच्या निकालात ७० टक्क्यासह दैदिप्यमान यश तिने मिळविले. तिच्या या यशाने शाळा आणि संस्थेतील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान होते.