६८ टक्के युवतींना रस्त्याने एकट्याने जाताना वाटते असुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Crime

शिक्षणाने स्त्रीजाणिवांचा परीघ व्यापक केला. प्रत्येक स्त्री शिकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी धडपडत आहे. यासाठी घराचा उंबरा ओलांडावा लागणारच.

Girls Unsecure : ६८ टक्के युवतींना रस्त्याने एकट्याने जाताना वाटते असुरक्षित

नागपूर - शिक्षणाने स्त्रीजाणिवांचा परीघ व्यापक केला. प्रत्येक स्त्री शिकून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी धडपडत आहे. यासाठी घराचा उंबरा ओलांडावा लागणारच. आणि तो ही एकट्याने. पण घराबाहेर पडल्यावर १८ ते २५ वयोगटातील ६८ टक्के युवतींना रस्त्याने चालताना असुरक्षित वाटत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘वी फॉर चेंज’ संस्थेच्या संशोधनातून समोर आले आहे. तर २५ वर्षाच्या पुढील ४९ टक्के स्त्रीया एकट्याने चालताना स्वतःला असुरक्षित समजतात.

‘वी फॉर चेंज’च्या संस्थापक डॉ. रश्मी पारसकर-सोवनी यांनी दोन गटात हे सर्वेक्षण केले.

त्यात १८ ते २५ आणि २५ ते त्यावरील वयाच्या महिलांचा अभ्यास करण्यात आला. १८ ते ६० वयोगटाच्या ६०९ महिलांनी फॉर्म भरले. या अभ्यासात नवतरुणी, तरुणी, मध्यमवयीन महिला ते ज्येष्ठ नागरिक महिलांचा सहभाग आहे. तुम्हाला कुठे सुरक्षित वाटत नाही या प्रश्नावर सदर निष्कर्ष बेतला आहे.

संशोधनानुसार १८ ते २५ वयोगटातील ८६ टक्के मुली स्वतःला असुरक्षित समजतात. गर्दीत एकट्याने जाताना, कामाच्या ठिकाणी, महाविद्यालयांमध्ये, परिचितांकडे, इतकेच नव्हे तर स्वतःच्या घरी सुद्धा त्यांना असुरक्षित वाटते. घरी असुरक्षित वाटण्याचे प्रमाण जरी अल्प असले तरी ही भावना मनात येणे म्हणजे समाज म्हणून आपण कुठे तरी चुकतोय हे अधोरेखित होते.

२५ वर्षापुढील तब्बल ७४ टक्के महिला स्वतःला असुरक्षित समजतात. लहान मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना असते कारण त्या जास्त वंचित असतात. हे समजण्यासारखे आहे पण २५ पुढील महिलाही स्वतःला सक्षम आणि सुरक्षित समजत नसल्याचे हे संशोधन सांगते जे समाज म्‍हणून प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त करते.

कुठे सुरक्षित वाटत नाही

  • वय वर्ष १८ ते २५

  • स्वतःच्या घरी ४.३ टक्के

  • परिचित/शेजारी/नातेवाईक १०.६ टक्के

  • कॉलेज ३.३ टक्के

  • कामाचे ठिकाण ५.३ टक्के

  • रत्याने एकटे जाताना ६८.१ टक्के

  • गर्दीत ३५.५ टक्के

  • स्वतःला सुरक्षित समजतो १३.२ टक्के

वय वर्ष २५ च्या पुढे

  • स्वतःच्या घरी २.६ टक्के

  • परिचित/शेजारी/नातेवाईक ४.६ टक्के

  • कॉलेज १.३ टक्के

  • कामाचे ठिकाण ५.२ टक्के

  • रत्याने एकटे जाताना ४९.२ टक्के

  • गर्दीत ३५.७ टक्के

  • स्वतःला सुरक्षित समजतो २५.२ टक्के

गर्दीत गुदमरतो जीव

कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडल्यावर १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात गर्दीचा सामना तर करावा लागतोच. दोन्ही वयोगटातील ३५ टक्के तरुणी व स्त्री स्वतःला गर्दीत असुरक्षित समजतात. ही असुरक्षितता उगाच नाही. त्याला काही कारणांची जोड असणारच. त्यांच्या मनात ही भावना आहे याचा अर्थ जग बदलले तरी समाजाच्या मानसिकतेत गर्दीचा फायदा घेण्याची भावना अजूनही आहे याला पाठबळ देते.

मुलींमध्ये भीडस्तपणा आणण्याची गरज

रस्त्याने एकटे जाताना दोन्ही वयोगटातील स्त्रीयांना असुरक्षित वाटते. त्यानंतर गर्दीत असुरक्षित वाटते. जुन्या पिढीच्या तुलनेत नव्या पिढीला स्वतःच्या घरी, शेजारी, परिचितांककडे व कॉलेजमध्ये अधिक असुरक्षित वाटू लागले आहेत. याला सामाजिक, सांस्कृतिक व काही प्रमाणात आर्थिक कारणेही असू शकतात. पण यातून बालपण खुरटत जाण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे मुलींमध्ये भीडस्तपणा आणण्याची आवश्यकता या संशोधनातून मांडण्यात आली आहे.