
Nagpur : बोहल्यावर चढण्यापूर्वी झाला घात
रामटेक : मध्यप्रदेशातील मुळगावी देवपूजेसाठी जात असलेल्या भावी वराचा नागपूर-जबलपूर मार्गावरील चोरबाहुलीजवळ अपघातात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. बोहल्यावर चढण्यापूर्वी नियतीने डाव साधल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रवींद्र नंदलाल अनकर (वय २८) मृत युवकाचे नाव असून दोन एप्रिलला त्याचे लग्न होणार होते.
देवलापारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्रच्या लग्नाची तयारी
बोहल्यावर चढण्यापूर्वी नियतीचा घात
सुरू असल्याने देवपूजेचा कार्यक्रमासाठी त्याच्या मुळगावी कंटगी (मध्यप्रदेश) येथे टाटा सुमोने (३१- डीसी- २८६२) जात होते. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजतादरम्यान अचानक वाहनातून धूर येताना दिसला.
त्यामुळे चोरबाहुली जवळ रस्त्याच्या कडेला वाहन थांबवून पाहणी करताना नागपूर ते जबलपूरच्या दिशेने मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने रविंद्रला धडक दिली. यात तो ३० ते ४० फुटावर रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. डावा पाय फॅक्चर झाला. त्याला देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखले केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अज्ञात वाहनचालक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
रामटेक : मध्यप्रदेशातील पचमढी येथून परत येताना चोरबाहुली शिवारात पहाटेच्या सुमारास टाटा सुमोच्या चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात घडला. यात ९ भाविक गंभीर जखमी झाले असून नागपूर, रामटेक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी घडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नजीकच्या महालगाव(काळू) येथे भाविक पचमढी येथून परत येत असताना त्यांच्या टाटा सुमो विक्टा (एम. एच.- ३१-सी.एस.२२६०) वाहनाला अपघात झाला. पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरून नियंत्रण सुटले. चोरबाहुली शिवारात वाहनाने दोन ते तीन वेळा पलटी घेतली.
डुलकी लागल्याने सुमो उलटली
यात सुनंदा बालाजी मसराम (वय ४०), बालाजी राधेश्याम मसराम (वय ४५) प्रवीण नानाजी थेटे (वय ४५), विनोद संभाजी थेटे (वय ४०) लक्ष्मण बालाजी मसराम (वय ३०) सविता विनोद थेटे (वय ३५) अविनाश अशोक (वय २२) मंगेश देवराव नन्नावरे (वय ३२) अविनाश राजेंद्र बर्डे (वय २३) रा. सर्व महालगाव (काळू), तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले.
चालकाने दुचाकीचालकाला मदत मागितली. त्याने गावात जाऊन ग्रामस्थांना बोलावून आणले. त्यानंतर वाहनातील जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना रामटेक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकलमध्ये हलविण्यात आले.
चालकाला इजा झाली नाही.चालक सारंग बालाजी कारमेंगे (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवलापारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे तपास करीत आहेत.