
Nagpur : अंबाझरी तलावात मायलेकीची आत्महत्या
नागपूर : अंबाझरी तलावामध्ये मायलेकीने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. कल्पना रवी पडांगळे (वय ३५) रा. रॉय टाऊन, इसासनी, हिंगणा रोड व मुलगी खुशी (वय ३) अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कल्पना यांचे पती रवी एमआरचे होते. लग्नाचे काही वर्षे आनंदात गेल्यावर दोघात भांडणे होऊ लागली. सतत वादामुळे कल्पना मुलीला घेऊन अंबाझरी तलाव परिसरात आल्या. सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी मुलगी खुशीला घेऊन तलावात उडी घेतली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
अंबाझरी पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलिसांनी रात्री शोधाशोध केली. मात्र, दोघींचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाच्या मदतीने दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कल्पना यांच्याजवळ चिठ्ठी आढळली असून त्यात पतीचा मोबाईल क्रमांक होता. पोलिसांनी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.