
Nagpur News: पठाणला पाच हजार मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक
Nagpur News : हिंगणा येथील शादाब पठाण व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला. कारण चेन्नई येथे तमिळनाडू शारीरिक शिक्षण विद्यापीठाच्या यजमानपदाखाली सुरू असलेल्या ८२ व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत
शादाबने पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेच्या ८२ वर्षाच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा धावपटू ठरला.
विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना शादाबने हे यश संपादन केले. त्याचप्रमाणे यापूर्वीचे विजेते श्रीनारायण पटेल यांनी सुद्धा पाच हजार मीटर शर्यतीतच सुवर्णपदक जिंकले होते. जिल्ह्यातील सिहोरा येथील आर्ट्स कॉलेजचा बीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या शादाबने बुधवारी सकाळी झालेल्या शर्यतीत १३ मिनिटे ५८.१८ सेकंदात सुवर्णपदक जिंकताना नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. पहिल्या दिवशी
पठाणला पाच हजार मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक
दहा हजार मीटर शर्यतीत चौथे स्थान मिळविणाऱ्या शादाबने आज स्पर्धा विक्रम करताना गेल्यावर्षी मंगळूर येथे झालेल्या स्पर्धेत कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या प्रिन्सने नोंदविलेला १४ मिनिटे ०५.४८ सेकंदाचा स्पर्धा विक्रम इतिहास जमा केला.
स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकणारा तो नागपूर विद्यापीठाचा एकूण (पुरुष व महिला) केवळ दुसरा धावपटू होय. यापूर्वी चारुलता नायगावकरने १९८४-८५ मध्य ग्वाल्हेर येथे झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय स्पर्धेत महिलांच्या तीन हजार मीटर शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
रवींद्र टोंग आणि उमेश नायडू यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या शादाबने यापूर्वी जागतिक विद्यापीठ स्पर्धेची पात्रता गाठली होती. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा रद्द झाल्याने त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी हुकली होती.
हे सुवर्णपदक फार समाधान देणारे आहे. दहा हजार मीटर शर्यतीत पदक हुकल्याने आज पूर्ण ताकद झोकून द्यायची हे ठरविले होते. माझ्या यशात प्रशिक्षक रवींद्र टोंग, उमेश नायडू यांचे मोलाचे योगदान आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील लक्ष्य आहे.
- शादाब पठाण,
सुवर्णपदक विजेता धावपटू. श्रीनारायण पटेल पहिले विजेते
आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीचा सर्वप्रथम पंजाब विद्यापीठ लाहोरच्या यजमानपदाखाली १९४१-४२ मध्ये झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. १९७४-७५ मध्ये कालिकत येथे ३५ वी स्पर्धा झाली होती.
यावेळी नागपूरच्या जीएस महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेले श्रीनारायण पटेल (सध्या सीताबर्डी येथील बॉम्बे लॉजचे मालक) यांनी १५ मिनिटे ३४.० सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक जिंकले होते. हे पुरुष धावपटूंनी नागपूर विद्यापीठासाठी जिंकले पहिले सुवर्णपदक होय.