
Nagpur : मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, गांजा फेकण्याचा प्रयत्न
नागपूर - मध्यवर्ती कारागृहाच्या कंम्पाऊंडवरून मोबाईल फोन आणि गांजा फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे कारागृह परिसरात खळबळ उडाली असून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारागृह रक्षकांच्या पेट्रोलिंगदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
गेल्या काही महिन्यात कैद्यांकडून कारागृहात मोबाईलचा वापर होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यातूनच काही कारागृह रक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारागृह चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी (ता.२६) दुपारच्या सुमारास कारागृहाच्या कम्पाऊडच्या भिंतीवरून पलीकडे मोबाईल फोन आणि गांजाचे पाकीट फेकल्याचे एका दक्ष कर्मचाऱ्याला आढळले.
तपासणी केल्यावर, एका पॅकेटमध्ये काळजीपूर्वक गुंडाळलेला मोबाइल फोन, गांजा असलेले वेगळे पार्सल आढळले. कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या नजीकच्या पाटबंधारे विभागाच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने हे फेकल्याचे तपासात समोर आले. कारागृहाच्या रुग्णालयाजवळ दोन्ही पॅकेट सापडले. त्याने याची सुचना तुरुंगाधिकाऱ्याना दिली.
प्रशासनाने तत्काळ कारवाई करत कारागृह धंतोली पोलिसांना जप्तीची सूचना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पाकिटे ताब्यात घेतली. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जयेश कारागृहातच, पोलिसांचे सर्च अभियान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून त्यांना धमकी देत खंडणी मागणारा जयेश पुजारी उर्फ कांथा सध्या नागपूर कारागृहात आहे. यापूर्वी त्याने बंगळुरू येथील बेळगाव कारागृहातून अशाच प्रकारे फोन मागवित, अनेकांना कॉल करीत धमकी दिली होती.
तो असताना असा प्रकार घडल्याने पोलिसांनी रात्री उशिरापर्यत कारागृहात सर्च ऑपरेशन राबविल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी याबाबत गोपनीयता बाळगल्याचे दिसत आहे.