नागपुरात ७२ तास होते ‘जनतेचे राज्य’

ऑगस्ट क्रांती दिवस : विद्यार्थ्यांचे आंदोलन ठरले लक्षवेधी
Nagpur August Kranti Din students agitation
Nagpur August Kranti Din students agitation

नागपूर : मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा देत देशवासीयांना ‘करो वा मरो’ची हाक दिली. ब्रिटिश साम्राज्यावर गांधीजींनी घातलेला मोठा घाव होता. सारा देश ब्रिटिश सत्तेविरोधात पेटून उभा राहिला. नागपूरही त्यात मागे नव्हते. ९ ऑगस्टपासून ८-१० दिवस नागपूर धगधगत होते. त्यापैकी तब्बल ७२ तास नागपूरकरांनी जनतेचे राज्य अनुभवले.

महात्मा गांधीच्या ८ ऑगस्टच्या ‘चले जाव''च्या घोषणेनंतर संपूर्ण देशात इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी सर्वत्र तीव्र आंदोलनास सुरुवात झाली होती. नागपुरातही क्रांतीच्या ज्वाला भडकल्या. नागपूरमध्ये मध्यप्रांताच्या राज्यपालांच्या वतीने त्यांचे सचिव टीसीएस जयरत्नम यांनी नागपूर विभाग काँग्रेस समिती, विदर्भ विभाग काँग्रेस समिती, नागपूर नगर काँग्रेस समिती, नागपूर तहसील काँग्रेस समिती, नागपूर काँग्रेस सोशालिस्ट पार्टी, हिंदुस्थानी लाल सेना, राष्ट्रीय युवक संघ नागपूर, काँग्रेस सेवादल नागपूर या संघटनांना बेकायदेशीर ठरवून त्यांच्या कार्यालयांना सील ठोकले होते. मोठ्या नेत्यांनाही अटक केली.

नेत्यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता हिंदुस्थानी लाल सेनेच्या वतीने सीताबर्डीतून मोठा मोर्चा काढण्यात आला. यानंतर निगम पार्क आणि कस्तुरचंद पार्कवर मोठ्या सभा झाल्या. त्यात इंग्रज सत्तेविरुद्ध घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी जनसमुदायाला पिटाळण्यास सुरुवात केली. याच दिवशी सायंकाळी एम. आर. चोलकर यांच्या अध्यक्षतेखाली चिटणीस पार्क येथे सभा झाली. त्यात १५ हजारांवर नागरिक उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी १० ऑगस्ट १९४२ ला हिस्लॉप, मॉरिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. त्यामुळे सहा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्या विरोधात विज्ञान कॉलेजच्या (सध्याचे शासकीय विज्ञान संस्था) विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरुवात केली.

तसेच पटवर्धन चौकात दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्यावर इंग्रज पोलिसांनी लाठीचार्ज केला. दुपारी चार हजारांवर विद्यार्थ्यांनी कस्तुरचंद पार्कमध्ये सभा घेतली. त्यातही इंग्रजांविरोधात घोषणाबाजी केल्याने या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. कोतवाली पोलिस चौकीजवळ झालेल्या सभेत, बलवंत कुणबी यांनी महात्मा गांधी यांचा संदेश वाचला. १२ ऑगस्टला नागपुरातील विविध भागात आंदोलन सुरू होते. त्यात सभांचे आयोजन करणे, पोलिस चौकी ताब्यात घेणे आणि टेलीग्रामच्या तारा कापणे आदींचा समावेश होता. इतकेच नव्हे तर या आंदोलनादरम्यान तहसील पोलिस चौकीतील खजिना लुटत इतवारी रेल्वे स्टेशन आणि डाक घरही जाळले.

मदनलाल बागडींना काळ्यापाण्याची तर शंकर महालेंना फाशीची शिक्षा

इंग्रजी शासनाच्या दडपशाही धोरणांविरोधात भूमिगत कारवायांना वेग आला होता. त्यात हिंदुस्थान लाल सेनेचे संचालन मगनलाल बागडी यांच्याकडे होते. त्यात १४०० स्वयंसेवकांचा समावेश होता. संघटनेच्या माध्यमातून पोलिस चौक्यांवर हल्ले करून तेथील शस्त्र चोरी केल्या जात होते. त्यापैकी नवाबपुरा येथील पोलिस चौकीवर हल्ला करीत असताना पोलिसांनी शंकर या स्वयंसेवकास अटक केली. त्याला नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली. मदनलाल बागडी यांना पकडण्यासाठी बक्षीस ठेवण्यात आले. १९४३ साली बागडींना अटक करीत काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com