
Nagpur News : उपराजधानीमध्ये बलून डेकोरेशनची वाढतेय क्रेझ
नागपूर : लग्न, वाढदिवस, बेबी शॉवर, हॉलिडे डेकोरेशन, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि पार्टी डेकोरेशनच्या इतर अनेक समारंभांसाठी कमी किमतीच्या आणि उच्च दर्जाच्या बलून आर्क डेकोरेशन सेटची मागणी वाढत आहे.
अर्ध्या ते एका तासापूर्वीसुद्धा सजावट करून देण्याची सुविधा शहरात उपलब्ध होत आहे. असे व्यावसायिक कार्यक्रमस्थळी पोहोचून तत्काळ सेवा देतात. ही बाजारपेठ अंदाजे आठ ते दहा कोटींची झालेली आहे.
एक लाखांपर्यंतची सजावट
बलून डेकोरेशन व्यवसायी मृणाल बुराडे यांनी सांगितले की, सामान्यत: पाच रुपये प्रतिबलून यानुसार पैसे आकारले जातात. सजावटीत कमी बलूनचा उपयोग होत असल्यास दहा रुपये प्रति बलून याप्रमाणे दर आकारला जातो. जर तीन हजारांवर बलूनचे डेकोरेशन असल्यास तीन ते चार रुपये प्रतिबलूनपर्यंत शुल्क घेतले जाते.
एक लाख रुपयांपर्यंतचे डेकोरेशन सेट उभारण्यात येतात. बलून, हवा भरण्याची मशिन आणि अन्य सजावटीच्या साहित्यासह पोहचून काही वेळातच घराच्या प्रवेशावर फुग्यांचे शानदार गेट, स्टेजवर सजावट, घराच्या समोर बलूनचे झुंबर, तोरण अशी सजावट करून देतात.
बलून डेकोरेटर निखिल चंद्रिकापुरे यांनी सांगितले की, यासाठी बलूनच्या आत एकप्रकारचे लिक्विड टाकले जाते, यानंतर हीलियम भरली जाते. रिसेप्शनमध्ये वर-वधूच्या प्रवेशावेळी दोन्ही बाजूला मोठ्या बलूनच्या आत हृदयाच्या आकाराचे अनेक बलून टाकल्या जातात. प्रवेशावेळी मोठा बलून फुटताच आतील हीलियम बलून हवेत उडतात.
हीलियम एन्ट्री प्रति जोडी २५०० रुपयांपासून सुरू होते. कोरोना निर्बंध संपुष्टात आल्याने लोक धुमधडाक्यात आयोजन करीत आहे. बलून डेकोरेटर्सला आता कामाची कमतरता नाही. शहरात हजाराहून अधिक लोक या व्यवसायाशी जुळलेले आहे.
क्रोम बलून : हे बलून सर्वच रंगात उपलब्ध आहेत. शेड कार्ड दाखवून रंगांची निवड करता येते. याची किंमत प्रति बलून १०० रुपये आहे.
लिंक बलून : याला कोणत्याही आकारात तयार करता येऊ शकते. बलूनच्या समोर एक कडी दिलेली असते, याला जोडून कोणतीही डिझाईन तयार करता येते. ७० रुपयांचा एक असा याचा दर आहे.
हीलियम बलूनला अधिक पसंती
बलून डेकोरेशनचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. यामध्ये हीलियम (हवेत उडणारे) बलूनची क्रेझ सर्वाधिक आहे. साधारण बलून पाच रुपयांपासून सुरू होते. तर ब्रँडेडची किंमत ७० रुपयांपासून आहे. शहराचे व्यवसायिक अनुज गुप्ता यांनी सांगितले की, ब्रँडेड बलूनचे कल्चर झपाट्याने वाढत आहे. ही सजावट अनेक दिवस टिकते. प्रत्येक आकारात आणि शेड्समध्ये ते उपलब्ध आहे. अशा बलूनचे वेगळे शेड कार्डसुद्धा येतात.