Nagpur : बिना संगमवर ‘रात्रीस चाले रेती उत्‍खनन’ Nagpur Bina Sangam Sand mining at night | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेतीघाट

Nagpur : बिना संगमवर ‘रात्रीस चाले रेती उत्‍खनन’

खापरखेडा : शासनाने नियम आणि शर्थींच्या अटींवर रेतीघाटांचा लिलाव केला. मात्र, बिना संगम येथील रेती घाटावर मागील आठवड्यापासून या नियम आणि अटींना लाथाडत रेती उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री आठ ते सकाळी आठ या काळात कन्हान नदीतून उत्खनन होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याविरोधात प्रशासन केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

बिना संगम रेती घाटावर नियमबाह्य रेती उत्खननाचे काम सुरू असल्याचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. ट्रकमध्ये रेती भरण्यासाठी पोकलेनचा वापर केला जात असल्याचे उघड झाले. सदर प्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे विशेष दुर्लक्ष असल्याची नागरिकांमध्ये ओरड सुरू झाली आहे.

नियमबाह्य अवैध रेती उत्खनन आणि रेती वाहतूक आढळून आल्यास कंत्राटदारावर कारवाई करून अनामत रक्कम, रेतीसाठा जप्त करण्याची अट आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाच्या अटी-शर्तीनुसार महसूल आणि पोलिस विभाग संबंधितांविरूद्ध कारवाई करणार का अथवा डोळेझाक करणार? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.