
नागपूर जिल्ह्यात स्वेच्छेने केलेल्या रक्तदानातून गतवर्षी ९०० पेक्षा अधिक रक्तपिशव्या दूषित आढळल्या.
Blood Transfusion : रक्तसंक्रमणातून चिमुकल्यांना मृत्यूचा विळखा; सिझेरियन मातांनाही जोखीम
नागपूर - नागपूर जिल्ह्यात स्वेच्छेने केलेल्या रक्तदानातून गतवर्षी ९०० पेक्षा अधिक रक्तपिशव्या दूषित आढळल्या. रक्तसंक्रमणातून दहा वर्षांखालील १२ थॅलेसिमियाग्रस्त-सिकलसेलग्रस्त चिमुकल्यांना एचआयव्ही, हिपॅटायटिस-बी आणि ‘सी’ आजाराची जीवघेणी बाधा झाली. यामुळे हे चिमुकले मृत्यूच्या दाढेत सापडत आहेत. महाराष्ट्रात दहा वर्षात स्वेच्छा रक्तदानातून १४४२ निष्पाप व्यक्तींना संक्रमित रक्त दिल्याने एचआयव्हीची बाधा झाली.
उपराजधानीत दरवर्षी ६० हजार प्रसूती होतात. यापैकी ६० टक्के प्रसूती सिझेरियन असतात. शस्त्रक्रियेतून होणाऱ्या सर्व प्रसूत मातांना रक्ताची गरज असते. सरकारी रुग्णालयात नॅट रक्ततपासणीचा अभाव असल्याने सिझेरियन प्रसूत मातांसाठी ही मोठी जोखीम आहे.
रक्ताचा विकार असलेल्या थॅलसेमिया, सिकलसेलग्रस्तांची संख्या नागपुरात जास्त आहे. थॅलेसेमियाग्रस्त मुलांना दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त न दिल्यास या मुलांची प्रकृती खालावते. चिमुकल्यांना नॅट तपासणीयुक्त रक्त मिळणे गरजेचे आहे. परंतु मेयो, मेडिकल, डागा या नागपुरातील सरकारी रुग्णालयात ‘नॅट’युक्त तपासणी होत नाही. यामुळे या रक्तदानातून मिळालेल्या रक्तातून एचआयव्ही, हिॅपेटायटिस बी, सी हे आजार संक्रमित होतात.
गरिबांनी १२०० रुपये आणायचे कुठून?
नॅट तपासणीसाठी सवलतीच्या दराचा विचार करता १,२०० रुपयांचा खर्च येतो. मात्र हा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. दूषित रक्त दिल्याने आठ महिन्यांपूर्वी दोन मुलांचा नागपुरात मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. अपघातातील जखमींसह कॅन्सर, रक्तविकारग्रस्त, गर्भवती महिला यांना उपचारादरम्यान रक्ताची गरज असते. ८० टक्के रुग्णांना सरकारी रुग्णालयात दाखल करावे लागते. नॅटयुक्त तपासणी होत नसल्याने त्यांना मिळणारे रक्त कितपत शुद्ध आहे, याची खात्री नसते. रक्तदानातून झालेले संक्रमण जिल्हा रुग्णालय तसेच सरकारी रुग्णालयात अधिक होते. सरकारी रक्तपेढीत इलायजा तपासणी होते; मात्र यात विंडो पिरियडमधील एचआयव्ही तसेच हिपॅटायटिस बी, सी हे विषाणू आढळत नाही.
रक्त संक्रमणातून झाला होता मृत्यू
नागपुरात रक्तदानात मिळालेले रक्त थॅलेसेमियाग्रस्तांना लावल्यानंतर त्यांना या रक्त संक्रमणातून एचआयव्ही, हिपॅटायटिसची बाधा झाली होती. यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे चौकशी सुरू आहे. शहरातील तीन रक्तपेढ्यांमधील २०१९ पासूनच्या नोंदी तपासल्या. पुढील आठवडाभरात ही चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल. या प्रकरणात रुग्णांवर उपचार झालेले रुग्णालय, रुग्णांचे नातेवाईक, इतरही संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. सात दिवसात एफडीए आयुक्तांमार्फत शासनाला अहवाल सादर होईल, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी दिली.
१६ महिन्यांत २२३४ रुग्णांना दूषित रक्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१६ मध्ये राज्यसभेत सादर केलेल्या अहवालानुसार भारतात १६ महिन्यांत २२३४ रुग्णांनी दूषित रक्त स्वीकारल्याने एचआयव्हीची बाधा झाली. तसेच हजारो रुग्णांना दूषित रक्ताने विविध आजारांचा प्रादूर्भाव झाल्याचे समोर आले. गुजरातमध्ये दर ६ रुग्णांमध्ये एकाला दूषित रक्तातून एचआयव्हीची बाधा झाल्याच्या प्रकरणाची माहिती आहे. पेशंट राईट्स फोरमने ही माहिती माहिती अधिकारातून मिळवली.