
Nagpur : उपराजधानीवर निधीचा वर्षाव
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नागपूरसह विदर्भाला भरभरून निधी देत घोषणांचा पंचामृत वर्षाव केला आहे.
यात मिहान प्रकल्पातील उर्वरित पुनर्वसनासह इतर पायाभूत सुविधा आणि विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी १०० कोटी तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापनेसाठी २२८ कोटी मंजूर केले. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी ५६४ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राने घोषित केलेल्या निधीचा उल्लेखही अर्थसंकल्पात केला आहे.
विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी जाहीर केले आहे. त्यात दुसऱ्या टप्प्यात गोल्फ कोर्ट, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, क्रीडा संकुलाचे नूतनीकरण आणि फुटबॉल मैदान विकसित करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाच्या विकासाचा विषय सध्या न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे. यावर तोडगा काढून विकास करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार पावले उचलण्याच्या तयारीला लागले आहे.
१ हजार ६८५ कोटींची गुंतवणूक करून विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी विकासकाला निविदा देण्यात आलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील आफ्रिकन सफारी आणि पक्षी उद्यान यावर्षी सुरू करणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
अमरावती रोडवर लॉजिस्टिक झोन उभारणार
शहराच्या विकासासाठी स्थापन केलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणने लॉजिस्टिक झोन म्हणून अमरावती रोडवरील गोंडखैरी, पेंढरीसह तीन गावांच्या परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन राखीव ठेवली आहे. याच परिसरात लॉजिस्टिक हब उभारला जाण्याची शक्यता आहे. या हबमध्ये वेअर हाऊस व मल्टिमॉडेल पार्क उभारले जातील. नागपूर सह पूर्व विदर्भातील कारखान्यांमध्ये उत्पादित होणारा माल येथे साठवला जाईल.
येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा माल मुंबईपर्यंत जलदगतीने पोहचविला जाईल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच विदर्भाच्या अर्थचक्राला गती मिळणार आहे. लॉजिस्टिक धोरणातही बदल करण्यात येणार असल्याने नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचा लाभ मिळणार आहे.
अर्थसंकल्पात वन खात्याच्या निधीत ३०० कोटीची वाढ
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात वन विभागाला २ हजार २९४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. मागील वर्षी १९९५ कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आले होते.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २९९ कोटी निधीत वाढ केलेली आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत असताना मानव- वन्यजीव संघर्ष वाढू लागला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या परिवाराच्या सदस्यांना २० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. देशात हे सर्वाधिक सानुग्रह अनुदान आहे.
याशिवाय वन्यप्राण्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान केल्यास शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात येते. आता सोलर कुंपणाची योजनाही वन विभागाने आणली आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पातील निधीत वाढ झालेली आहे. याशिवाय इतरही विकासात्मक प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच मानवाचे वनांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत.
कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र
राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या. त्यात नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात २२८ कोटींचे आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. येथे संशोधन केंद्र, प्रशिक्षण सभागृह, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येणार असून विद्यार्थी, शेतकरी आणि शास्त्रज्ञांना एका छत्राखाली कृषी क्षेत्रासाठी काम करता येणार आहे. दाभा परिसरातील महाविद्यालयाच्या जागेवर हे केंद्र उभारले जाणार आहे.
शहराला काय मिळाले ?
नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी २२८ कोटी रुपये
नागपूर, काटोल, कळमेश्वर आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी २० कोटी
राज्यभरात उभारण्यात येणाऱ्या शिवचरित्र उद्यानात नागपूरचाही समावेश.
नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी
नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील अफ्रिकन सफारी आणि पक्षी उद्यान यावर्षी सुरू करणार
विदर्भ साहित्य संघाला १० कोटी
नागपूर येथे १ हजार एकरावर लॉजिस्टिक हब
नागपूरसह सहा शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला अनुदान देणार
लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा व अनुदान
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी
नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा : ४३.८० किमी साठी ६ हजार ७०८ कोटी (केंद्राने घोषित केलेल्या निधीचीच घोषणा)
श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूरसाठी ६ कोटी
वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूरसह
सात जिल्ह्यांना लाभ
महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
शेतकरी सन्मान योजना - जिल्ह्यातील ७२ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
जिल्हा परिषदेतील १६ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, जि. प. चा भार होणार कमी