
नागपूर : ‘नन्हे फरिश्ते’मुळे वाचली ७४५ मुले
नागपूर - मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबवून घरातून रेल्वेने पळालेल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. मध्य रेल्वेच्या सुरक्षा दल (आरपीएफ)ने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ७४५ मुलांची सुटका केली आहे. गेल्या ६ महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबविण्यात आली.
मुले घरून पळून जातात. मोठ्या शहराचे आकर्षण आणि घरात त्रास यामागे प्रमुख कारण असते. अशा मुलांना शोधण्यासाठी मध्य रेल्वेने ही विशेष मोहीम राबविली. मध्य रेल्वेचे प्रशिक्षित आरपीएफचे जवान अशा मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा संपर्क साधण्याचा सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून ४९० मुले आणि २५५ मुलींना वाचवून चाइल्ड लाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पालकांच्या स्वाधीन केले.
मानवी तस्करीसाठी रोखण्यासाठी करार
रेल्वेने नुकताच असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन (एव्हीए) सोबत देशातील रेल्वेमार्गे मानवी तस्करी थांबविण्याच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या संघटनेला बचपन बचाओ आंदोलन असेही म्हणतात. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन्स फाउंडेशनशी ही संघटना संबंधित आहे. मानवी तस्करी विरोधात कडक कारवाई करण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून आरपीएफने ‘ऑपरेशन एएएचटी’ सुद्धा सुरू केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
नागपूर विभागात ५६ मुलांची नोंद
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ मुलांची नोंदणी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींना वाचविण्यात आले आहे. नागपूर विभागात ५६ मुलांची नोंदणी झाली असून त्यात ३० मुले आणि २६ मुलींचा समावेश आहे. भुसावळ मंडळाने १३८ मुलांची नोंदणी केली असून त्यात ७२ मुले व ६६ मुली आहेत. पुणे विभागात १३६ मुलांची नोंदणी झाली असून त्यात ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे. तर सोलापूर मंडळात ३४ मुलांची नोंदणी झाली असून त्यात २० मुले आणि १४ मुली आहेत.