Nagpur : इथे चक्क नाकावर रुमाल ठेवून जावे लागते! Nagpur Citizens suffer stench Reality in Bhivasankhori in Hazaripahad area | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर

Nagpur : इथे चक्क नाकावर रुमाल ठेवून जावे लागते!

हजारीपहाड : झपाट्याने विकास होत असलेल्या हजारी पहाडमध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच प्रकारचे नागरिक राहतात. ते मनपाला नियमित कर देतात. मात्र त्याउपरही त्यांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागते.

या भागातील भिवसनखोरीमध्ये दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर पसरत असल्याने पादचाऱ्यांना चक्क नाकावर रुमाल ठेवून ये-जा करावी लागते. याच परिसरातील अनुशक्तीनगरमध्ये नाला आहे; मात्र भिंत (वॉल कम्पाउंड) नसल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

‘सकाळ’च्या टीमने हजारीपहाड भागाचा फेरफटका मारला असता, या भागात रोड, नाल्या, गडर, दुर्गंधी व कचऱ्याच्या प्रमुख समस्या आढळून आल्या. येथील नागरिक मनपाला नियमित टॅक्स देतात. मात्र त्याउपरही त्यांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित राहावे लागते. सर्वात विदारक चित्र भिवसनखोरीत पाहायला मिळाले. हजारीपहाडमधील दुर्लक्षित असलेल्या या भागात घाण पाण्याची मोठी समस्या आहे.

येथे गडरलाईन नसल्यामुळे घाण पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहते. वाहनधारकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागते. पादचाऱ्यांना चक्क नाकावर रुमाल ठेवून घराची वाट धरावी लागते. हा भिवसनखोरीतून हजारीपहाडकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र ही समस्या ना अधिकाऱ्यांना दिसत, ना मनपाला. गडरलाईन झाल्यास या समस्येतून कायमची सुटका होऊ शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

नाला आहे; पण भिंत नाही

अनुशक्तीनगरमध्ये मोठी समस्या आहे. येथे पाणी वाहून जाण्यासाठी नाला तर आहे; मात्र भिंत नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांममध्ये नाल्याला पूर येऊन आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार आकाश यादव व गोपाल उपाध्याय यांनी केली. ते म्हणाले, आमच्या घराजवळून नाला वाहतो.

मात्र, अद्याप वॉल कम्पाउंडच बांधली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पहाडावरील पाणी व माती नाल्यात येऊन नाला तुडुंब भरून वाहतो. आजूबाजूंच्या घरांमध्ये पाणी शिरते. यासंदर्भात मनपासह आमदार विकास ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली. लवकरच भिंत बांधणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र अद्याप बांधकाम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोकाट कुत्रे व जनावरांचाही हैदोस

या भागात मोकाट कुत्रे व जनावरांचाही मोठा हैदोस आहे. या सर्वांचा त्रास वाहनधारक व पादचाऱ्यांना होतो. रात्री-बेरात्री ड्यूटी करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे धावत असतात. त्यामुळे वाहने घसरून वाहनधारक जखमी होण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात अशा अपघाताच्या घटना वारंवार घडत असल्याचे सांगून, अधिकारी व नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रशांत मांडके यांनी केली.

सुखावणारे दृश्यही

या भागात समस्या तर अनेक आहेत; पण सुखद धक्का देणारे दृश्यही पाहायला मिळाले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्यापैकीच एक. या पॉश केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस व पुरेसा स्टाफ असल्याने गोरगरीब रुग्णांना नियमितपणे उत्तम आरोग्यसेवा मिळते. छोट्या-मोठ्या आजारांसाठी परिसरातील अनेक रुग्ण येथे येत असतात. केंद्रात सकाळपासूनच महिला व पुरुष रुग्णांची मोठी गर्दी असते, असे येथे उपचारासाठी आलेले आर. एस. पाल यांनी सांगितले. शिवाय परिसरात स्वच्छताही पाहायला मिळाली.

उघड्या चेंबरमुळे नागरिक त्रस्त

हजारीपहाडमध्ये उघड्या चेंबरमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी गडर चोक झाले आहेत. गडरचे झाकण तुटलेले व लिकेज असल्याने घाण पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे हवेत दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गडरलाइनचे काम चांगले व परमनंट करण्याची गरज आहे. प्रभागात चार-चार नगरसेवक आहेत; पण कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे नळसुद्धा नियमित येत नाही. जागोजागी नळ खराब असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी वाया जाते.