Nagpur : एप्रिलमध्ये धो-धो पाऊस, आणखी किती ‘अच्छे दिन’ हवेत ; हास्यरसात नागपूरकर चिंब Nagpur city rain experiencing monsoons throughout the summer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

Nagpur : एप्रिलमध्ये धो-धो पाऊस, आणखी किती ‘अच्छे दिन’ हवेत ; हास्यरसात नागपूरकर चिंब

नागपूर : सध्या कुठलीही घटना घडली की त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटते. गेल्या काही दिवसांपासून दररोज पाऊस पडत असून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲपवर भन्नाट जोक्स, मीम्स व्हायरल होत आहेत. आज पहाटेपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावताच जोक्स, मीम्सचाही पाऊस पडण्यास सुरुवात झाली. नागपूरकर दिवसभर हास्यरसात चिंब झाल्याचे चित्र होते.

शहरात वादळासह पावसामुळे भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती येत आहे. दररोज हा प्रकार सुरू असल्याने उष्ण एप्रिल एकदम थंड झाल्याने नागपूरकर सुखावले आहे. या थंड वातावरणामुळे सोशल मीडियावरही हास्याचे जोरदार कारंजे उडताना दिसून येत आहे. आज फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सॲपवर अवकाळी पावसावरून मीम्स व जोक्सचा अक्षरशः पाऊस पडला. पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्यावरही काही जोक्स दिसून आले.

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर यांनी ‘तात्पुरते म्हणून विदर्भाला थंड हवेचा प्रदेश जाहीर करण्यास हरकत नाही.’ अशी ओळ त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केली. यावर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या. एकाने ‘गरिबांची चेरापुंजी म्हणून जाहीर करायला हवे’ अशी प्रतिक्रिया दिली असून यावरही हास्याचे फवारे उडत आहे. एका तरुणाने हिंदीत ‘अप्रेल में सावन का मजा, और कितने अच्छे दिन होना?’ अशी पोस्ट व्हायरल केली. यावरही भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहे.

डॉ. भालचंद्र माधव हरदास यांनी ‘म्हटलं ते समर व्हेकेशन म्हणायचं की नाही?’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. एकाने ‘दुकानदार पण कन्फ्यूज, छत्री विकू का कूलर’, अशी पोस्ट शेअर केली आहे. ‘कोणत्या बेडकांचं लग्न झाली माहिती नाही, रोज पाऊस पडत आहे’ या पोस्टवर हास्याचे कारंजे उडविणाऱ्या प्रतिक्रिया दिसून येत आहे. ‘बेडकाचे लग्न कुणी लावले, याचा शोध घ्या’, ‘बेडकाला सोडचिठ्ठी घ्यायला लावून पावसाळ्यात पुन्हा लग्न लावून द्यावे’, ‘बळजबरीने लग्न लावून दिले असावे’ अशा अनेक प्रतिक्रिया नागरिकांचे मनोरंजन करीत आहे.

सोशल मीडियावर जोक्स, मीम्सची बरसात ः हास्यरसात नागपूरकर चिंब

दिघोरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद

नागपूर, ता. ३० ः अमृत योजनेंतर्गत ताजबाग जलकुंभाला मुख्य जलवाहिनी जोडण्याची कामे २ मे रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे दिघोरी जलकुंभाकडील जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. परिणामी या जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा होणार नाही. जलवाहिनी आंतरजोडणीची कामे मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत उमरेड रोडवरील ताजबाग मुख्य गेटसमोर सुरू राहील.

त्यामुळे नेहरूनगर झोनअंतर्गत दिघोरी जलकुंभावरून होणाऱ्या प्रेमनगर, सर्वश्रीनगर, कीर्तीनगर, वैभवनगर, बेलदारनगर, संत तुकडोजीनगर, राहुलनगर, स्मृतीनगर, गौसिया कॉलनी, आझाद कॉलनी, शिवांगी सोसायटी, अतकरे लेआउट, आणि निराला सोसायटी या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.