Nagpur News : नागपूर शहरात सावली सोडतेय साथ! वृक्ष छायेच्या क्षेत्रात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Collapse

नागपूर शहरात गेल्या तीन वर्षांत वादळामुळे तब्बल सव्वादोनशे झाडे नष्ट झाली.

Nagpur News : नागपूर शहरात सावली सोडतेय साथ! वृक्ष छायेच्या क्षेत्रात घट

नागपूर - शहरात गेल्या तीन वर्षांत वादळामुळे तब्बल सव्वादोनशे झाडे नष्ट झाली. यातील काही झाडे अनेक दशके जुनी व उन्हाळ्यात सावली देणारी होती. परिणामी शहराच्या सावलीच्या क्षेत्रफळातही घट झाली. विशेष म्हणजे लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमध्ये झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले.

दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या वादळामुळे शहरातील झाडांच्या संख्येत घट होते. यावर्षी मागील महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळ आले. यात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली. उद्यान विभागाच्या आकड्यानुसार वादळाने २०१९, २०२० व २०२२ मध्ये एकूण २३० झाडे उन्मळून पडली. यात मागील महिन्यात आलेल्या वादळात ३४ झाडे पडली. एकीकडे शहरावर हिरवळीचे आच्छादन वाढविण्याचा महापालिकेकडून प्रयत्न होत असताना नैसर्गिक संकटामुळे जुनी व सावली देणारी झाडे पडत असल्याने महापालिकेनेही चिंता व्यक्त केली.

सिमेंटीकरणामुळे झाडे कमकुवत

सिमेंटीकरणामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने झाडे कमकुवत होऊन कोसळत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात झाडांसाठी पर्यावरणवादी व महापालिका संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने आता झाडांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सोबतच झाडे का उन्मळून पडत आहे, याबाबत सर्वेक्षण केले जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. यासोबतच झाडे उन्मळून पडू नये, यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

शहरातील रस्त्यांच्या सिमेंटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने झाडांची मुळे कमकुवत होत आहेत. झाडांच्या बुंध्याशी असलेल्या मातीच्या वरच्या थरांमध्ये अनेक मुळे असतात. ही मुळे झाडांना ओलावा आणि पोषक द्रव्य पोहोचवितात. तीच कमकुवत होत असल्याने वादळात झाडे उन्मळून पडत आहे.

- कौस्तव चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाउंडेशन.

जुनी झाडे वाचविण्याची गरज

काही वर्षांपूर्वी सिमेंटचे रस्ते तयार करताना झाडांना नुकसान होणार नाही, याबाबत कंत्राटदारांसाठी योजना आखली होती. महापालिकेने शहराची हिरवळ वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. झाडे तोडण्याची परवानगी देताना वृक्षारोपण करण्याची सक्ती करण्यात आली. यातून शहरात हजारो रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात शहरावरील हिरवे आच्छादन वाढणार असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नमूद केले. परंतु सिमेंटीकरण करताना महापालिकेने जुनी झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpurtreestorm