नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत होणार केव्हा?

घोषणा २०० कोटींची : सव्वा वर्षात दमडीही मिळाली नाही!
Nagpur Collectorate new building construction pending
Nagpur Collectorate new building construction pendingsakal

नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नवीन इमारतीसाठी २०० कोटी रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. परंतु सव्वा वर्षांत एकही रुपयाही देण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत केव्हा उभारणार. अर्थसंकल्पातील घोषणेवरच अमल होत नसेल तर फायदा काय, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील इमारत ब्रिटीशकालीन आहे. देखभालीमुळे इमारतीचा दर्शनी भाग प्रशस्त दिसतो. जुनाट रचना, दुर्गंधी, भलेमोठे टेबल, फाईलींचा ढिगारा आणि त्यावर साचलेल्या धुळीमुळे येथे अधिकारी कसे बसतात असा प्रश्न पडतो. जिल्हाधिकारी आणि काही बड्या अधिकाऱ्यांचा कक्षात एसीपासून सर्व चांगल्या सुविधा आहेत. मात्र इतर कर्मचारी ब्रिटीशकाळातच काम करतात असे चित्र आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित अनेक विभाग इतर ठिकाणी आहेत. हे सर्व विभाग एकाच ठिकाणी आणण्यासाठी याच परिसरात नवीन प्रशस्त व पाच माळ्यांची इमारत बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे.

पाच माळ्यांच्या इमारतींसाठी २०० कोटींच्या खर्चाचे इस्टिमेट तयार केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आढावा घेण्यासाठी नागपूरमध्ये आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर इमारतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात २०० कोटी देण्याची घोषणा केली होती. सव्वा वर्ष होत असताना अद्याप दमडीही मिळाली नाही. त्यामुळे इमारतीच्या प्रस्तावावर धूळ साचली आहे. या दरम्यान दोन जिल्हाधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करून बदलून गेलेत.

सध्या आर. विमला या नागपूरच्या जिल्हाधिकारी आहेत. त्यांचाही आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र शासनदरबारी इमारतीच्या निधीची फाईल हलताना दिसत नाही. एरवी दावे, अनुदान आणि छोट्‍या-छोट्‍या कामांसाठी सर्वसामान्यांना चकरा मारायला लावणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःच्या इमारतीकरिता अनुदानसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com