Nagpur : चिमुकल्यांना जन्मतःच हृदयविकार ; सुदृढ बालक अभियानातील माहितीने खळबळ Nagpur Congenital heart disease infants Healthy Child Campaign | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Child

Nagpur : चिमुकल्यांना जन्मतःच हृदयविकार ; सुदृढ बालक अभियानातील माहितीने खळबळ

नागपूर : आरोग्य विभागाच्या ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियानांतर्गत अंगणवाड्यांसह प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील चिमुकल्यांची तपासणी करण्यात आली. यात पाच मुले जन्मताच ह्रदयविकाराने ग्रस्त व तब्बल अडीच हजारांवर मुले इतर व्याधीग्रस्त आढळल्याने खळबळ उडाली आहे.

यातील १७५ मुलांना दृष्टिदोष असून तिरळेपणा असलेल्या मुलांचा समावेश आहे. या मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येतील. राज्य सरकारच्या निर्देशानुसार

चिमुकल्यांना जन्मतःच हृदयविकार

९ फेब्रुवारीपासून ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबवले जात आहे. वेळेत आजाराचे निदान झाल्यास तत्काळ उपचार होण्यास मदत होईल. तरत पुढची पिढी सुदृढ असेल, या दृष्टिकोनातून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे ही मोहीम सुरू केली गेली.

या अंतर्गत ० ते ६ व ६ ते १८ या वयोगटातील बालकांची आणि किशोरवयीनांच्या तपासणीसाठी १९५ आरोग्य पथके तैनात केली आहेत. यामध्ये जिल्ह्यात सुमारे १.४३ लाखावर बालकांची तपासणी झाली. यात २ हजार ४३८ मुले व्याधिग्रस्त असल्याचे उघड झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे या मुलांवर उपचार होतील.

९ एप्रिलपर्यंत तपासणी

आरोग्य पथकामार्फत ९ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२३ या दोन महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, शाळाबाह्य मुले आदी अशा सुमारे दोन लाखांवरील बालकांची तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२३ या महिन्याभरात आरोग्य विभागाच्या पथकांनी ० ते ६ वयोगटातील ६३ हजार ०१२ बालकांची तपासणी केली. ६ ते १८ वयोगटातील ८० हजार ८५५ किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी केली. यात २४३८ बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींना विविध व्याधी असल्याचे पुढे आले.

आढळलेले आजार असे

दातांचे आजार असलेली मुले - ६३० त्वचा रोगग्रस्त मुले - १४५

बोलण्यास उशीर होत असलेली मुले (स्पीच डिले) - ५० दुभंगलेले ओठ - २

सातत्याने सर्दी खोकला असणारी मुले - ५० तिरळेपणा - ५

दृष्टिदोष असलेली मुले - १७० जन्मतः हृदयाशी संबंधित आजार - ५

आजार कोणताही असो, त्वरित निदान झाल्यास तत्काळ उपचार होतात. या मोहिमेअंतर्गत जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयविकार, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, अस्थमा, इपिलेप्सी अन्य आजाराच्या संदिग्ध रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात येतील. मुलांवर जिल्हा, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, डागा, मेयो, मेडिकलमध्ये उपचार होतील.

— डॉ. दीपक सेलोकर,माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर.