
Cotton Rate Crisis: दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, कापसाला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरीच ठेवला. भाव मिळेल या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले.
Cotton Rate Crisis: कापसाचे ढीग पाहून शेतकऱ्यांचे वाढले टेन्शन
नागपूर - दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, कापसाला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरीच ठेवला. भाव मिळेल या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले.
आता होळीचा सणही आला तरी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे टेन्शन वाढले आहे. किती दिवस कापूस ठेवायचा,असा चिंतातूर प्रश्न त्यांच्यापुढे आहे. उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव आठ हजारांच्या पुढे जात नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. नरखेड, काटोल, सावनेर, हिंगणा, नागपूर ग्रामीण, उमरेड तालुक्यापर्यंत मर्यादित असलेले कपाशीचे पीक आता रामटेक, भिवापूर, कुही, पारशिवनी आणि मौदा तालुक्यातही घेणे सुरू झाले.
गेल्या काही वर्षांत कापसाचे उत्पादन घेणारे जमिनीचे क्षेत्र वाढले. मात्र त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नाही. सध्या कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी ती शेतकऱ्यांना फारशी लाभदायक ठरत नाही. कारण औषधी आणि इतर खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचा हाती फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत असतो.
यावर्षी सतत पाऊस आल्याने कपाशीचे उत्पादन होईल किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, दिवाळीनंतर कपाशीला दिलासा मिळाला. कापूस निघाल्यानंतर सुरुवातीला भाव १४ हजार ते १५ हजार होता. त्यानंतर काही दिवसातच भाव मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीसाठी कापूस विकणे बंद केले.
चार महिन्यापासून कापूस कुलूपबंद
कापसाला भाव मिळेल, या आशेवर गेल्या चार महिन्यापासून शेतकऱ्यांना कापूस विकला नाही. आता व्यापारी ८ हजार रुपये भावाने शेतकऱ्यांचा कापूस मागत आहेत.
या भावामध्ये शेतकऱ्यांचा कापूस लागवडीसाठी लागलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने पिकविलेला कापूस व्यापाऱ्यांना कसा द्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस भरून ठेवलेला आहे. गेल्या चार महिन्यापासून भाव वाढेल, या अपेक्षेने घरातच कापूस पडून आहे त्याची घट देखील होत आहे.
चूक शेतकऱ्यांच्या अंगलट
सुरुवातीच्या काळात कापसाला १४ हजारांवर भाव होता. हा भाव बऱ्यापैकी होता. मात्र, कापसाचे उत्पादन कमी झाले, अशा वावड्या उडाल्याने भविष्यात कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी त्यावेळी कापूस विकला नाही.
तीच चूक आता शेतकऱ्यांच्या अंगलट आली आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी कापूस विकला असता आणि कापूस घरात भरून ठेवण्याची वेळ आली नसती. गेल्या चार महिन्यापासून कापूस घरी असल्यामुळे कापसात घट येण्याची शक्यता आहे.
शेतकरी अडचणीत
भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. दिवाळी गेली. होळीही आली तरी कापसाला भाव नाही. त्यामुळे सणासुदीतही शेतकरी अडचणीत सापडला आहे.
काही दिवसांत एक एप्रिलपासून नवे आर्थिक वर्षे सुरू होणार आहे. कापसासाठी घेतलेले पीककर्ज शेतकऱ्यांनी भरावे लागणार आहे. बॅंकाही त्यांना काही दिवसांत नोटीस पाठवतील. अशा दुहेरी चक्रात सध्या शेतकरी सापडला आहे.
कापूस घरी पडून असल्यामुळे चिंता वाढली आहे. कापसाला भाववाढ मिळत नाही. सरकारचे धोरणही शेतकरी विरोधात आहे. भाववाढीची आता आशा नाही.
कमी भावात कापूस विकून नुकसान सहन करावे लागणार आहे. सध्या तरी काही उपाय दिसून येत नाही. सरकारने यावर उपाययोजना करावी. अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.
- पुंडलिक घ्यार, कापूस उत्पादक
सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. कापसाला गेल्या चार महिन्यापासून भाव नाही. घरी कापूस ठेऊन शेतकरी कंटाळला आहे. शेतीसाठी लावलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
सरकार कापूस बाजारपेठ संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. बाहेर देशातील कापूस आयात करून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सापडत आहे. याविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे.
- राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते.