
Nagpur : व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा ; रंगूनवालासह ९ जणांवर गुन्हा
नागपूर : ट्रेड प्रॉफिट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांनी गंडविले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आरीफ रंगूलवालासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जॉय हरिभाई चांदराणा (वय ४९,रा. हिंगणाघाट) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
आरिफ रंगूनवाला, सत्येंद्र शुक्ला, हितेश रेवतकर, जयंत वानखेडे, अविनाश भोरेकर, मेहुल मारडिया ऊर्फ गणपत, कैलास ऊर्फ विलास नरवाडे, अजय अग्रवाल ऊर्फ सुलतान तहेखन, विवेक अग्रवाल अशी आरोपींची नावे आहेत.
भालदारपुऱ्यातील रंगूनवाला बिल्डिंग येथे जॉय यांची शीलदेव या मित्राच्या माध्यमातून हितेश, जयंत, अविनाशसोबत ओळख झाली. आरिफ व अन्य आरोपीनी मुंबईतील टेड प्रॉफिट फंड कंपनीत दोन कोटींची गुंतवणूक केल्यास ३ कोटी २० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. चांदराणा यांनी दोन कोटी रुपये गुंतविले. मात्र, मूळ रक्कम व नफा मिळाला नाही. आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. चांदराणा यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली.