
आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या आरोपी पतीला न्यायालयाने दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा व दंड ठोठावला.
Nagpur Crime : आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
नागपूर - आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा व १ लाख रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आसिफ ताज मोहम्मद पठाण (वय २४, रा. काटोल रोड, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे. तर, महिमा विटोले (वय २०) असे मृत पत्नीचे नाव आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी हा निर्णय दिला. ही घटना ३० एप्रिल २०१८ रोजी मानकापूर परिसरात घडली होती. महिमा ही तत्वज्ञान या विषयात पदवीचे शिक्षण घेत होती.
तसेच, ती व्यावसायिक फोटोग्राफी व मेहंदी काढण्याचा व्यवसाय करायची. तिचे आसिफसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे, जुलै २०१६ मध्ये ती अठरा वर्षांची झाल्यानंतर त्या दोघांनी मंदिरात लग्न केले. तेव्हापासून साधारणतः आठ महिने ते पती-पत्नी म्हणून राहत होते. मात्र, त्यानंतर त्यांचे एकमेकांसोबत पटले नाही. आसिफ महिमावर संशय घेता होता. यावरून त्यांच्यात सतत भांडण होत होते.
याला कंटाळून अखेर ती आई-वडिलांकडे गेली. सुमारे एक वर्षापासून ती तिकडेच राहत होती. परंतु, हत्येच्या काही दिवसांपूर्वी आसिफ तिच्यावर सोबत राहण्यावरून दबाव टाकत होता. यासाठी सतत तो तिच्या घरी फोन करत होता. मात्र, महिमा त्याच्यासोबत राहण्यास तयार नव्हती. या रागातून आसिफने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. मृतक महिमाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आसिफवर हत्येचा गुन्हा दाखल केला.
न्यायालयाने सर्व साक्षीपुरव्यांच्या आधारे आरोपी पती आसिफला दोषी ठरवित त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. राज्य सरकारतर्फे अॅड. आसावरी परसोडकर यांनी बाजू मांडली.