
Nagpur Crime: धक्कादायक! नागपूर शहरातून ८ हजार ९२८ महिला, मुली बेपत्ता; रोज २-३ अपहरणाच्या तक्रारी
नागपूर : ''केरळ स्टोरी''च्या माध्यमातून महिला आणि मुलींच्या अपहरणाचे वास्तव समोर आले असताना राज्याच्या उपराजधानीतून अद्याप ४०२ महिला मुलींचा शोध लागला नसल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातून ८ हजार ९२८ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या असून त्यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दररोज दोन ते तीन मिसिंग व अपहरणाच्या तक्रारी येतात. फूस लावून पळविणे, घरातून प्रियकरासोबत पळून जाणे, रागावल्याने निघून जाणे आशा विविध कारणांनी मुली व महिला पलायन करतात.
अनेकदा मुलींची विक्री होण्याचीही घटना समोर येते. यावरच आधारित '' द केरल स्टोरी'' या चित्रपटातून चित्रण मांडण्यात आले. मात्र, यावेगळे राज्याचेही चित्र नसून एकट्या उपराजधानीतून जवळपास ८ हजार ९२८ मुली आणि महिला बेपत्ता वा अपहृत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
या महिला व मुलींना शोधण्यासाठी एकीकडे पोलिसांनी ऑपरेशन ''मुस्कान'' राबविले. दोन वर्षांपासून मानवी तस्करी विरोधी पथकही तयार करण्यात आले. त्यातून ८ हजार ५२६ मुली आणि महिलांचा शोध पोलिसांनी लावला आहे. मात्र, पाच वर्षांत ४०२ महिलांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यात ३७० महिला तर ३२ मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक ९१ प्रकरणे गेल्या वर्षी २०२२ मध्ये उघडकीस आली आहेत.