
खापरखेडा -संपत्तीच्या वादातून गेल्यावर्षी होळीच्या दिवशी प्रियकराकडून भावाचा खून करविला होता. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी सिल्लेवाडा येथील युवतीस अटक केली आहे. राणी पासवान(वय २०) असे तिचे नाव आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
संपत्तीवरून गेल्यावर्षी होळीच्या दिवशी निखिल अशोक पासवान आणि राणी यांच्यात वाद झाला होता. निखिलने राणीला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून राणीने प्रियकर राहुल राजन सूर्यवंशी याला निखिलचा काटा काढण्यास प्रवृत्त केले.
घटनेच्या दिवशी राहुल आणि निखिल दोघांनीही दारू प्राशन केली होती. नंतर एकाच बाईकने दोघेही सोबत कोराडीवरून दहेगावकडे जाणाऱ्या किल्ले कोलार मार्गाने सर्व्हिस रोडने गेले होते. कोलार परिसरात राहुलने निखिलला दुचाकी थांबविण्यास सांगितले. दुचाकी थांबविताच राहुलने निखिलच्या पोटावर आणि मानेवर सपासप वार केले
निखिलच्या शरीरावर तब्बल ४० वार करण्यात आले. खुनानंतर राहुलने पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी राणी बिहारमध्ये होती पण राहुलसोबत तिचा सतत संवाद सुरू होता. पोलिसांना घटनास्थळावर निखिलचा निखिलचा मृतदेह आढळला होता. बाजूलाच त्याची दुचाकी होती. सावनेर न्यायालय बंद असल्याने राणीला कळमेश्वर न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. पुढील तपास एपीआय दीपक कांकरेडवार करीत आहेत.