
Nagpur crime : दोन खुनांनी हादरले नागपूर ; अनैतिक संबंधातून दोघींचा गेला बळी
नागपूर : अनैतिक संबंधातून शहरातील दोन ठाण्यांतर्गत दोन महिलांचा खून केल्याची घटना शनिवारी समोर आल्याने नागपूर हादरले. पहिली घटना वाठोड्यात उघडकीस आली असून अनैतिक संबंधातून ४२ वर्षीय महिलेला हिंगणा परिसरातील रुई शिवारात प्रियकराने नेऊन तिचा दगडाने ठेचून खून केला.
तर दुसऱ्या घटनेत हुडकेश्वर येथे मामेभावासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेची उशीने तोंड दाबून हत्या केली. ही घटना शनिवारी (ता.२५) उघडकीस आली.पहिल्या घटनेत वाठोडा येथील दीपक इंगळे (वय ४० रा. साईबाबनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव असून तो ‘आपली बस’चा चालक आहे.
दोन खुनांनी हादरले नागपूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते तीन वर्षांपूर्वी दीपक इंगळे याचे महिलेशी प्रेमसंबंध जुळले. ते नेहमीच एकमेकांना भेटायचे. दरम्यान दीपक नेहमीच तिला आपल्या दुचाकीने हिंगण्यातील रुई परिसरात घेऊन जायचा. गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यावर दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याची शंका घेत होता.
त्यातून गुरुवारी (ता.२३) तो महिलेला घेऊन गेला. यावेळी दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणाने त्याने तिच्याशी वाद घातला. त्यामुळे येथून निघू असे तिने म्हटल्यावर मागे वळताच, तेथील दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात हाणला. त्यामुळे जखमी झाल्याने ती खाली कोसळली. यानंतर त्याने दगडाने वार करून तिचा खून केला आणि पसार झाला.
दरम्यान उशीर झाल्यानंतरही पत्नी घरी न परतल्याने पतीने वाठोडा ठाण्यात ती बेपत्ता असल्याची सूचना केली. शुक्रवारी पोलिसांनी तक्रार दाखल केली. दरम्यान तपासात त्यांनी तिच्यासोबत संबंधित असलेल्यांची चौकशी केली असता, त्यात दीपकला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान महिलेचा खून केल्याची माहिती दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी यांनी तत्काळ हिंगण्यातील रुई परिसर गाठला आणि तपास सुरू केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविण्यात आला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करीत, त्याला अटक करण्यात आली आहे.
......
मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख
दीपकची महिलेशी तीन वर्षांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली होती. दीपक तिच्या माध्यमातून ड्रायव्हरची कामे मिळवित होता. त्या भेटीतून दोघांचेही प्रेम फुलले. त्यातून ते दोघेही गुपचूप एकमेकांना भेटायचे. दीड वर्षांपूर्वीच तो आपली बसमध्ये चालक म्हणून रुजू झाला होता.
लिव्ह-इनमधील आतेबहिणीची हत्या
दुसरी घटनेत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मामेभावाने ३० वर्षीय आतेबहिणीचा वादातून खून केला. ही घटना शनिवारी (ता.२५) दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास घडली. राजू शंभुजी पानतावणे (वय ४०) असे आरोपीचे तर पायल आकाश गजभिये (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पायल हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले.
मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ती नागपुरात राहायला आली. यावेळी तिचे मामेभाऊ राजू पानतावणे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही एकत्र एक वर्षापासून ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. आज शनिवारी (ता.२५) दोघांत वाद झाला. रागाच्या भारात राजूने उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. याबाबत कळताच हुडकेश्वर पोलिस तेथे पोहोचले आणि राजूला अटक केली. चौकशीत त्याने खून केल्याचे मान्य केले.