फुगे माराल तर सावधान! गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Dhulivandan

धुलिवंदन साजरे करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. पण नागपुरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे.

Dhulivandan : फुगे माराल तर सावधान! गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

नागपूर - धुलिवंदन साजरे करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. पण नागपुरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी रस्त्यावरून जात असताना, अचानक रंगाने भरलेल्या फुग्यांचा मारा होताना दिसून येतो. या प्रकाराने अनेकदा अपघात होण्याची भीती होते. विशेष म्हणजे अशा अपघातांचीही नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. अनेकजन या दिवशी दारू पिऊन फिरत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत पोलिस गंभीर असून आयुक्तांनी त्याविरोधात तक्रार आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे फुगे मारणाऱ्यांवर कारवाई निश्‍चित असल्याचे समजते.

दरम्यान शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सज्ज झाला असून आज (ता. ५) रात्रीपासून शहरातील ४० ठिकाणांवर पोलिस तैनात होते. अनुसुचित घटना घडून नये म्हणून ४ हजारावर पोलिसांचा ताफा लावण्यात आला आहे. शाळकरी मुला मुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलिस सलग गस्त करणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. दरम्यान विविध रस्त्यांवर नाकेबंदी करीत, त्यांची तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, गरज पडल्यास उड्डाणपुलही बंद करण्याची वाहतूक पोलिसांची तयारी आहे.

मुलांकडे ठेवा लक्ष

धुलीवंदनाच्या दिवशी फुग्यात पाणी भरून चिमुकले वरच्या माळ्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर फुगे फेकताना दिसून येतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, त्यांना असा प्रकार करण्यास पालकांनी मनाई करावी असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.