नागपूर : कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

लवकर निदान झाल्यास उपचार शक्य
Cancer treatment
Cancer treatmentsakal

नागपूर : कॅन्सर म्हणजे मरणच, त्यावर आता उपचारच नाही, या समजापासून आपण खूप दूर गेलो आहोत. कारण मागील पंधरा वर्षात कॅन्सरवर नियंत्रण मिळवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अनेक सपोर्ट ग्रुप तयार झाले आहेत. कॅन्सरग्रस्तांच्या आयुर्मानात वाढ झाली आहे. मात्र खानापानात रसायनांचा वापर, व्यायामाचा अभावांसह बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सर वाढत आहे. सुखवस्तू जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढून त्यातून कॅन्सर डोके वर काढतो.

पन्नाशीनंतर क्वचित दिसणारा कॅन्सर तिशीतील तरुणींमध्ये स्तन कॅन्सरच्या रुपातून दिसतो. कॅन्सर कोणताही असो, शरीराला विळखा घालण्यापुर्वी लक्षणांमधून संकेत देतो. पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सरचे निदान झाल्यास उपचारातून ९९ टक्के सामान्य जीवन जगता येते, असे निरिक्षण कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. अशोक दिवाण यांनी नोंदवले.

स्तन कॅन्सर क्रमांक एकवर

एखाद्याला कॅन्सर झाला की आता मरणाशिवाय पर्याय नाही, हा समज चित्रपटांमधून रुढ झाला. महिलांमध्ये कधीकाळी गर्भाशयाचा कॅन्सर नंबर ‘वन''वर होता, आता स्तन कॅन्सर क्रमांक एकवर आहे. त्यापाठोपाठ महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आढळतो. कॅन्सर कुठेही होऊ शकतो. प्रोस्टेट ग्रंथी, मुत्राशय, रक्ताचा कॅन्सर असे. कॅन्सरचे निदान झाले की, व्यक्‍ती मानसिकदृष्ट्या खचत होती. आता कॅन्सर असूनही अनेकजण तब्बल २५ वर्षे सामान्य जीवन जगत आहेत.

नागपुरी खर्रा धोक्याचा

‘पान खाणं’ ही आपली संस्कृती. पानठेल्यावर दररोज पान खाणारे शौकीन दिसतात. सोबतच सर्वाधिक ग्राहक असतात ते ‘खर्रा’ खाणारे. नागपुरी खर्रा देशात प्रसिद्ध आहे. यात सुपारीचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, तंबाखू, चुना मिसळून खूप ‘घोटला’ जातो. खर्रा जितका घोटला जाईल तेवढा रंगत आणतो, असे म्हणतात, परंतु यातील तंबाखुमध्ये सुमारे चार हजार ८०० प्रकारची रसायने असून यातील ६९ प्रकारची रसायने तर कॅन्सरला पोषक ठरतात. धुम्रपानामुळे कॅन्सर अधिक गतीने वाढत आहे. भारतीय चिकित्सा संशोधन परिषदेच्या सर्वेक्षणातून ४० टक्के कॅन्सर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनातून होतो.

कॅन्सर होण्यापूर्वी मिळतात संकेत

  • कॅन्सर होण्यापुर्वी मेंदूला सूचना देतो.

  • मुखाचा कॅन्सरमध्ये तोंडाला फोडं येणे, आवाजात बदल होतो.

  • अन्ननलिकेचा कॅन्सरमध्ये गिळताना त्रास होतो.

  • जेवताना नेहमी ठसका लागतो, शरीरातील रक्त कमी होते.

  • स्तनाच्या कॅन्सरमध्ये बगलेत किंवा स्तनामध्ये गाठ येते.

  • गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये पांढरे पाणी जाते, रक्तस्त्राव होतो.

कॅन्सरचा विळखा

  • जगात दरवर्षी कॅन्सरचे १ कोटी ६० रुग्ण आढळतात.

  • जगात ८० लाख व्यक्तींचा कॅन्सरने मृत्यू होतो.

  • जगात ८ पैकी १ महिला कॅन्सरच्या विळख्यात.

  • भारतात दरवर्षी १० लाख नवीन कॅन्सरग्रस्त आढळतात.

  • भारतात ३.५ लाख मृत्यू दरवर्षी कॅन्सरने होतात.

  • भारतात २२ पैकी १ महिला स्तन कॅन्सरच्या विळख्यात.

  • हेड ॲण्ड नेक कॅन्सरचे प्रमाण ३३ टक्के आहे.

देशात कॅन्सर झाल्यानंतर उपचारासाठी लोक डॉक्टरांकडे लोकं जातात तोपर्यंत तो पुढच्या स्टेजला पोहोचलेला असतो. परंतु विकसित देशामध्ये दर महिन्याला नागरिकांची तपासणी होते. प्राथमिक टप्प्यावर निदान झाल्यामुळे या आजाराला दूर ठेवणे सोपे जाते. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर सुमारे अडीच तास न झोपल्यास कॅन्सर होण्याची जोखीम कमी होते.

-डॉ.अशोक दिवाण, विभागप्रमुख, रेडिओथेरपी विभाग, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com