Nagpur : कुत्रे उठले नागपूरकरांच्या जीवावर Nagpur Dogs rise up dog bites 22 percent increase | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dogs rise

Nagpur : कुत्रे उठले नागपूरकरांच्या जीवावर

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत शहरात मोकाट कुत्र्यांचा धुडगूस चांगलाच वाढला असून दररोज सरासरी २४ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. २०२१-२२ तुलनेत २०२२-२३ मध्ये श्वानदंशात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अद्यापही मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी कुठलीही पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना दहशतीतच दिवस काढावे लागणार असल्याचे चित्र आहे.

वाठोडा परिसरातील अनमोलनगर येथील शिवाजी पार्क भागात सात भटक्या कुत्र्यांनी घरासमोर एका चिमुकलीवर हल्ला केला. मेडिकल कॅम्पसमध्ये दोन डॉक्टरांवरही कुत्र्यांनी हल्ला केला. हे फक्त हिमनगाचे एक टोक आहे. २०२२-२३ मध्ये शहरात कुत्र्यांनी चावा घेतलेली ८७२२ प्रकरणे आहेत. अर्थात दररोज सरासरी २४ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला.

२०२१-२२ मध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याची ६८०६ प्रकरणे होती. परंतु २०२२-२३ या प्रकरणात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी केवळ महापालिकेतील आहे. मेयो, मेडिकल व खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचा यात समावेश नाही. अन्यथा ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कुत्रे उठले नागपूरकरांच्या जीवावर

दररोज शहरात कुठल्या ना कुठल्या परिसरात मोकाट कुत्रे नागरिकांचे लचके तोडत आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर साडेचार हजार प्रकरणे

ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अनेक आदेश जारी केले होते. महिन्यानुसार श्वानदंशाची आकडेवारी बघितल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या सहा महिन्यांत शहरात ४,५७६ प्रकरणे नोंदवली गेली.

महाल भागात सर्वाधिक दहशत

महाल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्वाधिक ३ हजार ६६४ प्रकरणे आढळून आली. महापालिकेच्या इंदिरा गांधी रूग्णालयात गेल्या एका वर्षात १ हजार ९८७ जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत. महापालिकेच्या सदर रुग्णालयात १ हजार ७२१ जणांना चावा घेतल्याची नोंद झाली आहे.

  • रुग्णालयनिहाय नोंद व वर्ष

  • रुग्णालये २०२२-२३ २०२१-२२

  • इंदिरा गांधी रुग्णालय १९८७ ९०८

  • पाचपावली प्रसूतीगृह ५२३ ३९६

  • सदर डायग्नोस्टिक सेंटर १७२१ १७४४

  • महाल डायग्नोस्टिक सेंटर ३६६४ ३५५६

  • आयसोलेशन हॉस्पिटल ८२७ २०२

  • थंडीत श्वान चावण्याचे प्रमाण अधिक

२०२२-२३ या वर्षात फक्त जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच श्वानदंशाचे प्रमाण कमी होते. या दोन महिन्यात प्रकरणांची संख्या सातशेवर होती. जानेवारीमध्ये मात्र श्वानाने नागरिकांवर हल्ला केल्याची एक हजार प्रकरणे नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.