
Nagpur : बाजारपेठांमध्ये लगीनघाई, सेवांचे बुकिंग सुरू ; व्यावसायिकांमध्ये उत्साह
नागपूर : मे आणि जूनपर्यंत अंदाजे २० ते २५ लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे लगीनघाईचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे कपड्यांसह सराफा बाजार, इव्हेन्ट मॅनेजमेंट, कॅटरर्सच्या व्यवसायाला पुन्हा झळाळी मिळणार आहे. त्यादृष्टीने बाजारपेठ सज्ज झालेल्या आहेत. व्यापाऱ्यांना यंदा उन्हाळ्यातील लग्नसराईत चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा आहे.
सर्वांनाच लग्नसोहळ्याची उत्सुकता लागलेली आहे. मे आणि जून महिन्याच्या मर्यादित तारखा असल्याने मंगल कार्यालय, लॉन, सभागृह, हॉटेल बुकिंग, हळदीचा कार्यक्रम-मेहंदीपासून बँड-बाजा, घोड्यांपर्यंतची बुकिंग सुरू झालेली आहे. बॅण्डवाल्यांनी लाखो रुपये खर्च करून नवीन साउंड वाहन, नवे युनिफॉर्म आणि इंस्ट्रूमेंट्स तयार केलेले आहेत. कॅटरर्सपासून कपड्यांपर्यंत तसेच सराफा बाजारही पुन्हा
बाजारपेठांमध्ये लगीनघाई, साहित्याचे बुकींग सुरू एकदा चमकण्यासाठी सज्ज झाला आहे.
लग्नाच्या सीजनमध्ये हजारो कोटींची उलाढाल होत असते. उन्हाळ्यातील लग्न समारंभाला सुरवात होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सभागृह, डीजे, बँड, घोडा यांच्यासोबतच पंडितांची चौकशीही केली जात आहे. शहरात लग्न सोहळ्यापेक्षा अनेकजण रिसॉर्ट आणि शहराबाहेरील लॉन्सच्या बुकिंगला पसंती देऊ लागले आहेत.
लग्न सराईसाठी बाजारपेठ सज्ज झालेली आहे. ग्राहकांची खरेदी हळू हळू सुरू असली तरी येत्या महिन्यात वर्दळ वाढणार असून कोट्यवधीची उलाढाल अपेक्षित आहे.
अजय मदान, माजी अध्यक्ष, होलसेल क्लॉथ ॲण्ड यार्न मर्चंट असोसिएशन
३० एप्रिलनंतर लग्नसराईला सुरवात होणार आहे. मे आणि जून महिन्यात २० ते २५ लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्याचदरम्यान, श्रावण व अधिक महिना आहे. त्यामुळे या दोन महिन्यातील मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात लग्न होतील.
भूपेश गाडवे, ज्योतिषी महागाईतही जोश
दैनंदिन जीवन विस्कळीत करणाऱ्या महागाईचा परिणाम विवाह सोहळ्यावरही होणार आहे. कोरोना काळानंतर किराणा, कपडे, बँड, गॅस, मंडप-सजावट, वाहतूक, कॅटरिंग, लॉन-सभागृहाचे भाडे, भाजीपाला यांच्या किमतीत वाढ झाली आहे. सध्या महागाईत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही विवाह सोहळ्यात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून जय्यत तयारीला लागले आहेत.
कोरोनाच्या काळात काहीशी विस्कळीत लग्नाची घडी आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. यंदा लग्नाच्या तारखाही ३० एप्रिलनंतर आहेत. बुकिंगसाठी विचारणा होत आहे. मात्र, अद्यापही कोरोनानंतर हवी तशी हालचाल बाजारात सुरू झालेली नाही. मात्र, लग्नाच्या सीजनपासून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. बुकिंगही चांगली होत आहे.
विजय तलमले, अध्यक्ष, नागपूर मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन
उन्हाळ्यात लग्नसराईसाठी बाजारात गर्दी वाढू लागलेली आहे. त्यासाठी शेरवानी, नवाबी, कुर्ता, रेडिमेड सुटस आणि कपड्यांची पूर्ण नवीन श्रेणी विक्रीसाठी आणलेली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात चांगली खरेदी होईल.
उदय जैन,संचालक, उदय शोरूम