
Nagpur : तिघांवर खंडणीचा गुन्हा ; १० रुपये पडले तृतीयपंथीयांना महागात
नागपूर : पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी बळजबरी वसुली करणाऱ्या तृतीयपंथींवर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. एक जण २० रुपये देत असताना त्याला ३० रुपयांसाठी धमकावून अधिकच्या १० रुपयांसाठी तृतीयपंथींनी आफत ओढवून घेतली. याप्रकरणी दुकानदाराच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंदविला.
जिया राजपूत (२१), जोजो जॉन (३०) आणि ललिता मडावी (२५) अशी आरोपी तृतीयपंथींची नावे आहेत. तिघेही मानकापूर झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. नागपूर पोलिस दलाच्या आदेशानुसार पैशांची मागणी करताना बळजबरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतरही हे तिघे दुकानांमध्ये जाऊन बळजबरीने
१० रुपये पडले तृतीयपंथीयांना महागात
पैशांची मागणी करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ते इतवारीतील आर्जव डोनगावकर (२६) याच्या दुकानात बिदागी मागण्यासाठी गेले. डोनगावकर यांनी २० रुपये देऊ केले. पण हे तिघेही अडून बसल्याने त्यांनी आणखी १० रुपये दिले आणि तहसील ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला.
आतापर्यंत २५ जणांविरुद्ध गुन्हे
पोलिस आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर शहर पोलिस तृतीयपंथीयांविरुद्ध चांगलेच सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी तृतीयपंथीयांच्या चार गटांमधील २५ सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये प्रामुख्याने पाचपावली पोलिसांनी हॉटेल मालकाकडून बळजबरीने पैसे घेणाऱ्या १२ तृतीयपंथीयांना पकडले. तसेच गिट्टीखदान व सीताबर्डी पोलिस ठाण्यांत १० तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. आता तहसिल पोलिसांनीसुद्धा तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले हे विशेष.