Nagpur : मोकाट जनावरे उठली जीवावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur  news

Nagpur : मोकाट जनावरे उठली जीवावर!

नागपूर : शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळप फिरताना तसेच ठाण मांडून दिसत आहे. अनेकदा दोन बैलांची झुंजही दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून दुचाकीधारक तसेच सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

शहरातील अनेक मोकळ्या मैदान, भूखंडांवर हिरवे गवत असल्याने जनावर मालकांनी गायी, म्हशींंना बिनधास्त मोकाट सोडले आहे. सकाळ ते सायंकाळपर्यंत मोकाट सुटलेली ही जनावरे पोट भरली की रस्त्यांवर येऊन गर्दी करीत आहे. अनेकदा गायींचा कळप रस्त्यांवर रवंथ करताना दिसतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठाण मांडल्याने दररोज पहायला मिळते. भाजीपाला विक्रेत्यांसह अनेक छोट्या व्यावसायिकांना या मोकाट जनावरांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसतो.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

रस्त्यांवर जनावरांचा वावर असतो. अशा रस्त्यांवरून वाहनचालक, पादचारी, वृद्ध, शालेय विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी कसरत करावी लागते. गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेत या संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. शहरातील रस्त्यांवर काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बडकस चौक, आयचित मंदिर, अजनी ते मेडिकल चौक, आयटी पार्क रोड, अंबाझरी तलाव रोड, हिंगणा टी पॉईंट, अग्रेसन चौक, इंदोरा चौक, लक्ष्मीनगर चौक, जगनाडे चौक, रामेश्वरी रोड, यशोधरा चौक, बेझनबाग, महाल, सक्करदरा चौक, नंदनवन चौक, अग्रेसन चौक, केळीबाग, तुकडोजी चौक, धंतोली चौक, रेल्वे स्थानक या मार्गावर मोकाट जनावरांचा त्रास सर्वाधिक आहे.

हेही वाचा: Nagpur : भाजपला मिळणार यश?

या रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. अनेकदा भरधाव येणाऱ्या वाहनांपुढे मोकाट जनावरे येत असल्याने वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. एखादवेळी भरधाव दुचाकीपुढे मोकाट जनावर आल्यास दुचाकीस्वाराचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका मोकाट जनावरे पकडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडी बाजार, फुल बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. परंतु, महापालिकेला येथील जनावरांचाही बंदोबस्त करता आला नाही.

हेही वाचा: Nagpur : सहा हजार किलोच्या कढईत ‘महा-चिवडा’

शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली होती. अनेक जनावरांची कोंडवाड्यामध्ये रवानगी करण्यात आली आहे. पुन्हा ही मोहीम झपाट्याने सुरू करू. ज्या मालकांची जनावरे वारंवार रस्त्यावर पकडली जातील, अशा जनावरांच्या मालकांवर मुंबई कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल.

- डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त घनकचरा व्यवस्थान व कोंडवाडा विभाग