
Nagpur G20 Summit : ‘जी-२०’ची बैठक अन् भिकाऱ्यांनी वाढवली डोकेदुखी
नागपूर : शहरात होणाऱ्या जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी महापालिकेने सौंदर्यीकरण, रोषणाई, शिल्पकला, लॅन्ड स्केपिंग करण्यावर भर दिला जात आहे. नववधूप्रमाणे शहरातील एका भागाची सजावट करण्यात येत आहे.
परंतु त्याचवेळी येथील भिकाऱ्यांमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. बैठकीसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांची नजर या भिकाऱ्यांवर पडू नये, यासाठी त्यांना महापालिकेच्या निवारा केंद्रात ठेवायचे की कारवाई करायची, त्यांची लपवाछपवी कशी करावी यावर महापालिका व पोलिस प्रशासन मंथन करीत आहे.
जी-२० बैठकीनिमित्त २० मार्चला शहरात विविध देशांचे दोनशेवर प्रतिनिधी येणार आहेत. हॉटेल रेडिसन ब्लू येथे २१ व २२ मार्चला बैठक होणार आहे. या बैठकीनिमित्त येणाऱ्या पाहुण्यांसाठी शहरातील वर्धा मार्गावर सौंदर्यीकरण करण्यात येत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला लॅन्डस्केपिंग, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक देखावे, शिल्प तयार करण्यात येत आहे. संत्रानगरी ही शहराची ओळख आहे. यासह आता शहराची ओळख आता ‘टायगर’ कॅपिटल म्हणून करण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे ‘वेलकम टू टायगर कॅपिटल’ अशा फलक पाहुण्याच्या रस्त्यात दिसून येणार आहे. परंतु सर्वाधिक भिकारीही वर्धा मार्गाच्या परिसरात आहेत.
यशवंत स्टेडियम परिसर, सीताबर्डी परिसर भिकाऱ्यांचा गड आहे. वर्धा मार्गावरील व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, पंचशील चौक, जनता चौक, रहाटे कॉलनी चौक, हॉटेल रेडिसन ब्लू, छत्रपती चौकात भिकाऱ्यांचा वावर दिसून येतो.
याच मार्गावरून तीन दिवस विदेशी पाहुण्यांची वर्दळ राहणार आहे. त्यामुळे या भिकाऱ्यांचे काय करायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन मंथन करीत आहे.
भिकाऱ्यांच्या जेवणाचा प्रश्न
महापालिकेचे निवारा केंद्र असून त्यात भिकाऱ्यांची व्यवस्था करणे शक्य आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांच्या जेवणाची सोय कशी करायची, हाही प्रश्न आहे. भिकाऱ्यांवर कारवाईची तयारी असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी सांगितले.
शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व भिकाऱ्यांची जेवणाची सोय करणे शक्य नाही. महापालिकेच्या निवारा केंद्रात ६० वर्षांवरील भिकाऱ्यांची सोय महापालिकेच्या निवारा केंद्रात करता येईल. परंतु इतरांची सोय करता येणार नाही. त्यामुळे इतर भिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. याबाबत पोलिस आयुक्तांसोबत चर्चा सुरू आहे.
- राधाकृष्णन बी., आयुक्त व प्रशासक, महापालिका.