
Nagpur : नायलॉन मांजाने कापला मुलीचा गळा
नागपूर : बंदी असूनही शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जात आहे. पतंग शौकिनांचा हा बेदरकारपणा धोक्याचा ठरत आहे. बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे एका ५ वर्षीय मुलीचा गळा कापल्याची घटना शुक्रवारी नागपुरातील फारूकनगर भागात घडली. या घटनेतील मुलगी बचावली असून, तिला तब्बल २६ टाके पडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे प्राणघातक नायलॉन मांजाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुलगी घरासमोरच रस्त्यावर खेळत असताना तिचा नॉयलॉन मांजाने गळा कापला गेला आहे. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बंदी असताना सुद्धा शहरात पतंग विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. मकरसंक्रांती जवळ आली असून मांजा आणि पतंग विक्रीचा बाजार सजला आहे.
सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. दुकानासमोर दुसरा मांजा विक्रीला ठेवला जातो. ग्राहकाने इशारा केल्यास हवा तेवढा नायलॉन मांजा मागच्या दाराने उपलब्ध करून दिला जात आहे. या मांजाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे. तर नायलॉनच्या मांजाने दरवर्षी हजारो पक्षी जखमी होतात तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू सुद्धा होतो.