Nagpur : हम अपनी समस्या बता नहीं सकते ; गोकुळपेठ मार्केटमधील दुकानदारांच्या संतप्त भावना Nagpur Gokulpeth market Despite paying rent to the Corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुलपेठ मार्केट

Nagpur : हम अपनी समस्या बता नहीं सकते ; गोकुळपेठ मार्केटमधील दुकानदारांच्या संतप्त भावना

गोकुळपेठ : ‘गोकुलपेठ मार्केट की गंदगी यही स्वच्छ भारत अभियान का असली चेहरा है. इस से स्वच्छ हिंदोस्तान कभी नहीं हो सकता. माजी मुख्यमंत्री साहब यही खेलकूद कर बडे हुए है. उनका बचपन यही गुजरा.

लेकीन उनका भी इस गंदगी पर ध्यान नहीं हैं. कार्पोरेशन को किराया देने के बावजूद यहां गडर और नाली के पानी की व्यवस्था नहीं. हम लगभग ५० सालों से इस मुसिबत का सामना कर रहें हैं. हम अगर कुछ बोलने जाए तो हमें सीधा देशद्रोही घोषित कर दिया जाएगा. हम तो अपनी समस्या बता भी नहीं सकते’, अशा संतप्त शब्दांत गोकुलपेठ मार्केटमधील साबित खान या भाजीपाला विक्रेत्याने आपली नाराजी बोलून दाखविली.

‘स्मार्ट डस्टबीन’ नावापुरत्याच

बाजारातून निघणारा कचरा गोळा करण्यासाठी मनपाने स्मार्ट डस्टबीनची व्यवस्था केली. मात्र, त्या डस्टबीनचा उपयोगही केला जात नसल्याचे चित्र आहे. स्वतः स्वच्छता कर्मचारी जमा केलेला कचरा डस्टबीनऐवजी त्याच्या बाजूला आणून टाकतात. त्यामुळे या डस्टबीन नावापुरत्याच आहेत. भाजीविक्रेते विजय धुर्या सांगतात की,

कित्येक दिवसांपासून या समस्येला आम्ही सामोरे जात आहोत. दुर्गंधीमुळे आमच्या दुकानात ग्राहक यायला तयार नाही. कचऱ्याबाबत तक्रार करूनही काही उपयोग नसल्याने आम्हाला दुर्गंधीचा सामना तर करावा लागतोच, शिवाय यामुळे आमच्या धंद्यावर विपरीत परिणाम होत आहे.

गोकुळपेठ मार्केट सदैव दुर्लक्षित

सध्या नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अगदी लहान लहान वस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे. पण, मागील ४० वर्षांपासून गोकुळपेठ मार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचे दृश्य आम्ही आतापर्यंत कधी पाहिले नसल्याचे दुकानदारांनी सांगितले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

घरातून लोक मार्केटसाठी येतात. परंतु, रस्त्यात होणाऱ्या अपघातांमुळे त्यांच्यावर कधीकधी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येते. या घटना विक्रेत्यांकरिता नवीन नाहीत. असे एक ना अनेक किस्से आहेत, असे टेलरिंग व्यवसाय करणारे मुकुंदा कर्णेवार यांनी सांगितले.

बाजारातच मातीचे ढिगारे

बाजारातील वाहतूक कोंडी पाहता शेजारीच स्मार्ट पार्किंगसुद्धा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु बांधकामादरम्यान निघालेली माती ऐन मध्यबाजारात टाकली जात असल्याने येथे मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.

याचा फटका मंगळवारी भरत असलेल्या आठवडी बाजाराला बसतो. जागेअभावी नागपुरातील विविध ठिकाणांहून येणारे भाजीविक्रेते आता या ठिकाणी दुकान लावू शकत नाही. बहुतांश विक्रेत्यांच्या कुटुंबाचे पोट आठवडी बाजारावर अवलंबून असते. मात्र, आता त्यांच्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्यांना वणवण भटकावे लागते, असे कैलाश मुढेवार या भाजीविक्रेत्याने सांगितले.

शौचालयाची व्यवस्थाच नाही

मागील दोन महिन्यांपासून स्मार्ट शौचालयाचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त शौचालयाची कोणतीच व्यवस्था नसल्याने आम्हाला उघड्यावर जावे लागते. एवढेच नाही तर दोन ते तीन तास लघवी धरून ठेवावी लागते.

त्यामुळे पोटावर ताण येतो. अनेकदा प्रकृती बिघडते. या भीतीने नाइलाजाने भिंतीच्या किंवा गाड्यांच्या आड जावे लागते. महानगरपालिका प्रत्येक महिन्यात वेळेवर आमच्याकडून भाडे वसूल करते. तरीही आमची ही अवस्था आहे.

आता हे नव्याने तयार होणारे ‘स्मार्ट टॉयलेट’ दिसायला सुंदर आहे; मात्र त्याचा उपयोग करण्यासाठी आम्हाला ज्यादा पैसे मोजावे लागतील. आम्ही गरीब लोकं पोट भरण्यासाठी दिवसभर भाजीपाला विकतो. त्यावर आमचा उदरनिर्वाह कसाबसा चालतो. आता ज्यादा पैसे देऊन शौचालयात जावे की, पोटापाण्यासाठी पैसे वाचवावे, हा प्रश्न आहे.