Nagpur : कुख्यात गुन्हेगार ‘गुलाबी गॅंग’चा म्होरक्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur gold jewelry theft Gulabi Gang

Nagpur : कुख्यात गुन्हेगार ‘गुलाबी गॅंग’चा म्होरक्या

नागपूर : धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चेनस्नॅचिंगच्या घटनेत सापडलेल्या ‘गुलाबी गॅंग’च्या सदस्या असलेल्या आरोपी दोन तरुणींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत आहेत. शहरातील एक कुख्यात गुंड या गॅंगला ऑपरेट करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलिस त्याच्या शोध घेत असून लवकरच गॅंगच्या इतरही सदस्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी ७.३० च्या सुमारास अरुंधती देवेंद्र तगनपल्लीवार (वय ५३ रा. विवेकानंदनगर, धंतोली) या परिसरातील रामकृष्ण पार्क समोरुन फिरत असताना, मागून दुचाकीवरुन येणाऱ्या २० ते २२ वयोगटातील दोन तरुणींनी त्यांच्या गळ्यातीळ सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला होता.

धंतोली पोलिसांनी त्यांना अटक केली. तेव्हा शहरात पाच ते सात तरुणींची ‘गुलाबी गॅंग’ असून ती अशा घटना घडवित असल्याची माहिती पुढे आली. मात्र, हे करीत असताना गुन्ह्यातून चोरलेले सोने आणि वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी या गॅंगमध्ये इतरही काही जण असल्याचा संशयावरुन पोलिसांनी तपास केला. तेव्हा शहरातील एक कुख्यात गुंड या गॅंगने चोरलेल्या सोन्याची आणि वस्तूची विल्हेवाट लावून पैशाची समसमान वाटणीही करतो.

वसीम असे या कुख्यात गुन्हेगार हा गॅंग मुख्य सुत्रधार असून त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण गॅंग ऑपरेट होत असल्याचे उजेडात आले. त्याच्या शोध धंतोली पोलिस घेत आहेत. दरम्यान त्रिशा खान हिला विशेष सत्र न्यायालयात सादर केले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

अल्पवयीन मुलगी सुधारगृहात

चेनस्नॅचिंगच्या घटनेमध्ये सापडलेली अल्पवयीन मुलगी कुख्यात आहे. तिचावर विविध ठाण्यात चार गुन्हे दाखल आहे. मात्र, नियमानुसार तिला जास्तवेळ कोठडीत ठेवता येत नसल्याने पोलिसांनी तिची रवानगी अमरावती येथील बालसुधारगृहात केली आहे.

कोण आहे वसीम

शहरातील चेनस्नॅचिंगसाठी तरुणी हेरुन त्यांच्या माध्यमातून महिलांच्या पर्स चोरणे, महिलांना लुटणे आणि मंगळसुत्र हिसकाविण्याचे काम केले जाते. हे चोरीचे साहित्य, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तुंचीही विल्हेवाट लावण्याचे काम वसीमच्या माध्यमातून होते. त्यासाठी त्याचा साथीदार आशूही त्याला मदत करीत असल्याची माहिती आहे.

सकाळीच केला होता चोरीचा प्रयत्न

चेनस्नॅचिंगच्या घटनेत धंतोली पोलिसांच्या हाती लागलेली त्रिशा खान हिने गॅंगमध्ये सहभागी झाल्यावर शुक्रवारी सकाळी सक्करदरा येथे त्रिशाने एका महिलेची पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडाओरड केल्याने ती नागरिकांच्या हाती सापडली. मात्र, याबाबत महिलेने कुठलीही तक्रार न केल्याने तिला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर तिने सायंकाळी चेनस्नॅचिंगचा प्रयत्न केला.