
नागपूर : रिंग टोन वाजताच मोबाईल चोर सापडला
नागपूर : मोबाईल चोरी केल्यानंतर त्यावर सतत फोन येत होते. समोर पोलिस होती. उचलून फोन सतत कट करणेही जमत नव्हते. अखेर पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. चौकशीत मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून डोंगरगढ येथे प्रकरण वर्ग करण्यात आले. ही घटना कोचुवेली एक्स्प्रेसमध्ये घडली. अजी कोडीकुंज (४२) रा. निलमबेल्ली असे तक्रारकर्त्या प्रवाशाचे नाव आहे.
ते कोचुवेली एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. झोपेत असताना आरोपीने त्यांच्याकडील १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. त्यांना जाग आल्यावर मोबाईल दिसला नाही. त्यांनी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना सांगितले. जवानांनी लगेच धावत्या गाडीत शोध घेतला. गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर असताना कोच बी-७ मधील एका प्रवाशा जवळील मोबाईलची वारंवार रिंगटोन वाजत होती. मात्र, तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. संशयाच्या आधारावर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बी-४ कोचमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्याला नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून डोंगरगड येथे प्रकरण वर्ग केले.
तसेच सुमीत बॅन (३३) रा. सावनेर हे केळवद रेल्वे स्थानकावर असताना आरोपी अंकित परतेती (१९) ने त्यांच्याजवळील ३५ हजार रुपये चोरले. या प्रकरणी इतवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्याचे छायाचित्र व्हॉट्स अॅपवर पाठविण्यात आले. त्यावरून पोलिसांनी शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडू ४ हजार ९०० रुपये जप्त केले. उर्वरित रक्कम खर्च झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.