Nagpur : देशातील शहरांना लागू होणार नागपूरचा ‘हीट ॲक्शन प्लान’ Nagpur Heat Action Plan implemented cities country | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heat Action Plan

Nagpur : देशातील शहरांना लागू होणार नागपूरचा ‘हीट ॲक्शन प्लान’

नागपूर : राष्ट्रीयस्तरावर एकच ‘हिट ॲक्शन प्लान’ तयार होत असून सध्यास्थितीतील उष्माघाताशी लढण्यासाठी असलेल्या कृती आराखड्यात त्याचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे देशातील शहरांसाठीचा ‘हीट ॲक्शन प्लान’ नागपुरातील विविध भागांतील तापमानाचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे.

व्हीएनआयटीच्या आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांनी ‘ड्राफ्ट मॉडेल’ तयार केले असून ते राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाकडे सोपविण्यात येणार आहे. सध्या प्रत्येक राज्याचा वेगळा हीट ॲक्शन प्लान आहे. महाराष्ट्रातही अंमलबजावणी केली जाते. परंतु हा उष्माघात कृती आराखडा दीर्घकालीन नाही. उद्यान सुरू करणे, दुपारी नागरिक, मजुरांना विश्रांतीचे आवाहन करणे,

देशातील शहरांना लागू होणार नागपूरचा ‘हीट ॲक्शन प्लान’

ठिकठिकाणी प्याऊ उघडणे एवढीच सध्यास्थितीत ‘हीट ॲक्शन प्लान’ची मर्यादा आहे. परंतु यावर अधिक काम करून देशातील इतर शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लान’ एकच असावा, हा दृष्टिकोन ठेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ही जबाबदारी नागपुरातील व्हीएनआयटीमधील आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. राजश्री कोठारकर यांच्यावर सोपवली.

गेल्या दहा वर्षांपासून त्या यावर काम करीत आहेत. देशात दीर्घकालीन हीट ॲक्शन प्लानसाठी नागपुरातील तापमानाचा गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला जात आहे. शहरातील विविध भागातील तापमानाचा अभ्यास करण्यात आला.

कुठल्या भागात जास्त, कुठे कमी तापमान आहे, या तापमानाचा लोकांवर काय परिणाम होतो, उंच इमारती असलेल्या भागात तसेच झाडे असलेल्या भागातील रहिवाशांवर कुठला परिणाम होतो यावर अभ्यास करून ड्राफ्ट तयार करण्यात आला. याशिवाय जगभरातील हिट ॲक्शन प्लानचाही अभ्यास करण्यात आला. स्थानिक वातावरणानुसार उपाययोजना सुचविण्यात येत असल्याचे डॉ. राजश्री कोठारकर यांनी नमूद केले.

नुकतीच याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एक कार्यशाळाही पार पडली. या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबतच विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी होते. या कार्यशाळेत ड्राफ्ट मॉडेल दाखविण्यात आले असून अंमलबजावणीसाठी काय करता येईल, यावरही चर्चा झाली. हीट ॲक्शन प्लान लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाकडे सोपविण्यात येणार आहे.

तापमानापासून बचावासाठी झाडे

शहरात रस्त्याच्या बाजूला, उद्यानात तसेच मोकळ्या जागेत बकुळीचे झाड लावावे.

याशिवाय आपल्या वातावरणात जगेल अशी कोणतीही झाडे लावणे. नागपुरातील कोणत्या भागात तापमानाची स्थिती काय आहे, याबाबत गेल्या दहा वर्षांपासून अभ्यास केला. त्यानुसार देशातील सर्वच शहरासाठी उपयोगात येईल,

अशा हीट ॲक्शन प्लानचे मॉडेल तयार करण्यात आले. नुकताच कार्यशाळेत राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना तसेच आयआयटी मुंबईतही सादरीकरण करण्यात आले. येत्या काळात ड्राफ्ट मॉडेल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सोपविण्यात येईल.

- डॉ. राजश्री कोठारकर, आर्किटेक्चर विभाग, व्हीएनआयटी, नागपूर.