'आम्ही जीव वाचवण्यासाठी टपावर बसलोय'; पुराच्या पाण्यात बुडालेल्या ST चालकाचा थरकाप उडवणारा Video Viral | Nagpur Flood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Flood

Nagpur Flood : 'आम्ही जीव वाचवण्यासाठी टपावर बसलोय'; पुराच्या पाण्यात बुडालेल्या ST चालकाचा थरकाप उडवणारा Video Viral

नागपूर : नागपूरमध्ये कालपासून पावसाने थैमान घातले असून शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना महानगर पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून ठरावीक परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

तर एसटीचे चालक आणि वाहक जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर बसल्याची धक्कादायक माहिती आहे. नागपुरातील मोरभवन बसस्टॉप येथील हा प्रकार आहे.

नागपुरातील पुराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये बचावपथकांच्या बोटी गस्त घालताना दिसत आहेत. तर काही व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यात गाड्या बुडाल्या असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस कर्मचारी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक व्हिडिओ एसटी बस कर्मचाऱ्याने शूट केला असून काही कर्मचारी आपला जीव वाचवण्यसाठी एसटीच्या टपावर बसलेले आहेत.

मोरभवन एसटी बसस्टँडवरील बस जवळपास ७० ते ८० टक्के पाण्यात बुडाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. "आम्ही जीव वाचवण्यासाठी एसटीच्या टपावर बसलो आहोत, अजून आम्हाला बाहेर काढण्यात आलं नाही." असं एक व्यक्ती व्हिडिओमध्ये सांगत आहे.

दरम्यान, अचानक झालेल्या पावसामुळे आणि निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर महापालिका प्रशासनाकडून शहरातील ड्रेनेजचं काम केलं जात नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.