नागपूर : ४० टक्के ज्येष्ठांना करायची आहे नोकरी!

हेल्पेज इंडियाचा अहवाल : शहरी गरीब व ग्रामीण भागात स्थिती वाईट
Nagpur 40% senior citizens want job
Nagpur 40% senior citizens want jobsakal

नागपूर : आयुष्याच्या उत्तरार्धात आलेले एकाकीपण, आप्तस्वकियांकडून होणारे दुर्लक्ष आणि दैनंदिन जीवनात भासणारी आर्थिक चणचणीमुळे कंटाळलेल्या तब्बल ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीचे बंधन तोडून पुन्हा नोकरी करण्याची मनापासून इच्छा असल्याची माहिती, हेल्पेज इंडियाच्या अहवालातून पुढे आली आहे.

जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जनजागृती दिवसाच्या पूर्वसंध्येवर हेल्पेज इंडियाचा राष्ट्रीय स्तरावरील सर्व्हेक्षणावर आधारित हा अहवाल मंगळवारी प्रकाशित झाला. या अहवालानुसार, कोरोना काळापासून ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठांना बसला आहे. जीवनातील एकाकीपणा दूर करण्यासाठी, उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी तसेच चार पैसे मिळावेत, या उद्देशाने बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना संधी मिळाल्यास नोकरी करण्याची इच्छा आहे. आकडेवारीनुसार, ७२ टक्के वृद्ध सध्या काहीच काम करीत नाहीत. मात्र, त्याचवेळी वृध्दांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्याचेही ६१ टक्के ज्येष्ठांचे मत आहे.

या अहवालात म्हटल्याप्रमाणे, ४० टक्के ज्येष्ठांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले आहे. निवृत्तीवेतन पुरेसे नसल्याचीही भावना ४५ टक्के ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात आर्थिक नियोजन आणि सामाजिक सुरक्षा, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित होते. सध्या देशातील ज्येष्ठांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के एवढी आहे. सर्व्हेक्षणात देशभरातल्या २२ शहरांमधील ४३९९ मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकांची मते घेण्यात आली.

या अहवालाचे नागपुरात मंगळवारी उपजिल्हाधिकारी (महसूल) पीयूष चिवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झाले. याप्रसंगी हेल्पेज इंडियाचे व्यवस्थापक सुनील ठाकूर, सीनियर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर, ज्येष्ठ नागरिक विदर्भ महामंडळाचे सचिव ॲड. अविनाश तेलंग, सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष हुकूमचंद मिश्रिकोटकर यांच्यासह शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

का करायचा आहे जॉब?

  • मुले,सुना,नातवंडे असूनही एकाकी

  • आर्थिक अडचणीत वाढ

  • उतारवयातील आजारांचा सामना करण्यासाठी

  • उर्वरित आयुष्य सन्मानाने घालवावे म्हणून

  • मनात असुरक्षिततेची भावना

ज्येष्ठ नागरिकांची अवस्था

  • देशात ज्येष्ठांची संख्या २३ कोटी ८० लाख

  • ७२ टक्के काहीच काम करीत नाहीत

  • ४७ टक्के पैशासाठी कुटुंबावर अवलंबून

  • ३४ टक्के वृद्धांना निवृत्ती वेतनाचा आधार

  • ५२ टक्के ज्येष्ठांचे उत्पन्न अपूरे

शहर असो वा खेडे

गरीब ज्येष्ठांची अवस्था बिकट या अहवालात शहरातील गरीब व ग्रामीण भागांतील वृद्धांच्या दुर्दशेवरही फोकस करण्यात आला आहे. शहरी गरीब व ग्रामीण वृद्धांकडे आधाराची कोणतीही व्यवस्था, पुरेसे उत्पन्न व निवृत्तीवेतन नसल्याचे म्हटले आहे. अशा ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे, यासाठी दरमहा तीन हजार रूपये सार्वत्रिक निवृत्तीवेतन मिळावे, अशी भूमिका हेल्पेज इंडियातर्फे मांडण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com