नागपूरला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने जोरदार तडाखा दिला

नागपूरला वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला

नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या उपराजधानीला दुपारी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. वादळामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. अनेक भागांत बत्ती गुल झाल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला. जागोजागी झाडे पडल्याने व विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महावितरणसह अग्निशमन विभागाचीही प्रचंड दमछाक झाली. मात्र त्याचवेळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने ऊन व उकाड्यापासून सुखद दिलासाही मिळाला. प्रादेशिक हवामान विभागाने नागपूर व विदर्भात तीन-चार दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे.

तो इशारा तंतोतंत खरा ठरला. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. पाहतापाहता सर्वत्र जोराचा वादळी पाऊस सुरू झाला. गोधनीपासून वर्धा रोडपर्यंत आणि वाडीपासून पारडीपर्यंत सगळीकडेच कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. वादळामुळे काटोल रोड, जरिपटका, सिव्हिल लाइन्ससह अनेक भागांत झाडे व फांद्या पडल्या. जागोजागी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेकडो नागरिकांना पंखे व कुलरविना राहावे लागले. महाल भागातही बराच वेळपर्यंत वीज नव्हती.

नवतपाच्या पूर्वसंध्येवर जवळपास १५ ते २० मिनिटे बरसलेल्या जोरदार वादळी पावसामुळे जागोजागी पाणी तुंबले होते. रस्त्यांवरून पाणी वाहिले. ध्यानीमनी नसताना अचानक पाऊस आल्याने अनेक जण भिजले. पण त्याचवेळी वातावरण आल्हाददायक बनल्याने उकाड्यापासून दिलासाही मिळाला. पावसामुळे तापमानातदेखील अडीच अंशांची घट होऊन आठ दिवसांत दुसऱ्यांदा पारा चाळीसच्या खाली आला. हवामान विभागाने विदर्भात आणखी तीन दिवस वादळी पावसाचा इशारा दिल्याने तोपर्यंत वरुणराजाचा मुक्काम राहणार आहे.

अनिल देशमुखांच्या

बंगल्याचेही नुकसान

वादळाच्या तडाख्यातून राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुखांचेही घर सुटले नाही. जोरदार वादळामुळे त्यांच्या सिव्हिल लाइन्सस्थित बंगल्याबाहेर असलेले मोठे झाड कोसळून बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान झाले. शिवाय बंगल्याचा सज्जा व भिंतीलाही तडे गेले. अखेर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करत पडलेले झाड हटविले.

Web Title: Nagpur Hit Hard By Torrential Rains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurrainSakale sakal
go to top