नागपूर : नोकरीच्या नावावर फसवणूक; टोळी पोलिसांच्या जाळ्यात

मास्टरमाईंड महिलेला बिहारमध्ये अटक
Nagpur job Fraud gang arrested by police
Nagpur job Fraud gang arrested by policesakal

नागपूर : वेकोली, रेल्वे आणि एसबीआयमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर विदर्भातील युवकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सध्या उघडकीस आलेल्या बारा फसवणुकीच्या प्रकरणात मास्टरमाईन्ड असलेल्या महिलेसह बिहार येथून तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य सूत्रधार असलेली शिल्पा राजू पालपार्थी (वय ४० रा. हुडकेश्‍वर), कुंदनकुमार ऊर्फ राहूल सिंग रमेश शर्मा (वय ३४ रा. तराढी, बेला पाटना, बिहार), आलम ऊर्फ रशिद अन्वर आलम ऊर्फ दानिश जिशान मोहम्मद आलम (वय ३५ रा. रुहाना, सुलतानगंज, पाटना) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केळवद पोलिस ठाण्यात २६ जुलै २०२१ साली सतीश प्रकाश आडे (वय ३० रा. खुरजगाव, सावनेर) याने वेकोली आणि एसबीआय येथे नोकरी लावून देण्यासाठी १० लाखाने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

त्या आधारावर अमित कोवे आणि शिल्पा पालपार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हा तपास ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक सेलकडे देण्यात आला. त्यांनी चौकशी सुरू केली असता, अनेक खुलासे समोर आले. त्यामध्ये अमित कोवे यांच्यामार्फत युवकांना नोकरीचे आमिष देत, युवकांना शिल्पा पालपार्थी आणि त्यांचे बिहार येथील साथीदार बोगस नियुक्तीपत्र देत होते. त्यासाठी अनेकांकडून लाखो रुपये घेतले. पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधिक्षक राहूल माकणीकर उपस्थित होते.

कॉल रेकॉर्डमधून हाती आले धागेदोरे

अमित कोवे याने जानेवारी महिन्यात आत्महत्या केली. त्यांच्या मोबाईलमधील संदेश आणि कॉल रेकॉर्ड तपासण्यात आल्यावर पोलिसांनी बिहार येथून कुंदनकुमार ऊर्फ राहूल सिंग, रमेश शर्मा आणि दानिश जिशान मोहम्मद आलम यांना ताब्यात घेतले. याशिवाय मुख्य सूत्रधार असलेल्या शिल्पालाही सोमवारी सकाळी ताब्यात घेतले. सध्या ग्रामीण भागातून ९ तर शहरी भागातून ३ जणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यातून जवळपास १ कोटी ३० लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शंका अधीक्षक विजय मगर यांनी व्यक्त केली.

विदर्भातील युवक टार्गेट

फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या ग्रामीणमधील ९ आणि शहरातील ३ युवकांचा समावेश असला तरी, अमरावती, चंद्रपूर, भंडारा येथेही शिल्पा पालपार्थी हिच्यावर गुन्हे दाखल असल्याने या टोळीने विदर्भातील युवकांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ बाराच युवक नसून इतर शहरांसह राज्यातही त्यांनी युवकांना कोट्यवधींनी गंडविल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिस कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. आतापर्यंत १३ जणांकडून सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून अनेकांना त्यांनी फसविले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अशी करायचे फसवणूक

शिल्पा पालपार्थी हिने मलेशियातून नर्सिंगचे ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर तिने बर्डी येथील प्लेसमेंट कंपनीत नोकरी केली. यावेळी तिचा संपर्क मोनाली मेश्राम या महिलेशी आला. मोनाली सध्या फसवणुकीच्या प्रकरणात कारागृहात आहे. २०१९ साली अमित शिल्पाच्या संपर्कात आला. तो युवकांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष देऊन शिल्पा पालपार्थी हिच्याकडे आणायचा. शिल्पा युवकांना मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख असल्याची बतावणी करायची. याशिवाय त्यांना आपल्या साथीदारांसह दिल्ली, कोलकता, मुंबई येथे अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी घेऊन जायची. त्यानंतर युवकांना बनावट नियुक्तीपत्र देत त्यांची फसवणूक करायची. विशेष म्हणजे, त्यांचे बिहार येथील दोन साथीदार हे सुटबुट घालून केवळ युवकांना इकडे-तिकडे नेण्याचे काम करायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com