नागपूर : राजकीय पेचात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मागे

सर्वेक्षणातील त्रुटीबाबत सूचनाच नाही
Nagpur OBC reservation
Nagpur OBC reservationsakal

नागपूर : शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष राजकीय अस्थिरतेकडे असताना यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मागे पडला आहे. आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात त्रुटी असल्याने त्या दूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असताना अद्याप प्रशासनाला कोणत्याच सूचना मिळालेल्या नाहीत.

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल करीत ते पूर्ववत करण्यासाठी काही निकषांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. वर्षभरानंतरही निकषांची पूर्तता झाली नाही. राज्य मागासवर्ग आयोगानंतर आता समर्पित आयोगाकडून यासाठी आवश्यक माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशाच्या धर्तीवर सर्वेक्षण करून ओबीसींची माहिती गोळा करण्यात आली. यात ओबीसींची मतदार संख्या निश्चित करण्यासाठी आडनावाचा आधार घेण्यात आला. आडनावावरून ओबीसी मतदार निश्चित करून संख्या काढण्यात आली. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने त्यापूर्वी ओबीसीचा निकाल लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे. आडनावावरून ओबीसी मतदार निश्चित करण्याच्या पद्धतीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही आक्षेप घेण्यात आले.

ओबीसी आरक्षण ठिकविण्यासाठी यात आवश्यक दुरुस्त्या करून नव्याने माहिती मागविण्याच्या सुतोवाच सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात आले होते. परंतु अद्याप कोणत्याही सुधारित सूचना प्रशासनाला आल्या नाहीत. सरकार, विरोधक आणि प्रशासन आधी राज्यसभा व नंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त होते. आता तर एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. सरकारच अस्थिर झाल्याचे चित्र आहे. सत्ता टिकविणे व मिळविणे हाच एकच मोठा विषय आहे. त्यामुळे इतर सर्वच विषय मागे पडले. यात ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा मागे पडल्याचे चित्र आहे.

ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने या मुद्याकडे लक्ष दिले पाहिजे. इम्पेरिकल डेटा तयार करून वेळेत न्यायालयात सादर करायला हवा.

-सचिन राजूरकर, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com