नागपूर : ऐतिहासिक तलाव होणार डबके?

कोट्यवधी खर्च करूनही अनेक तलाव गायब तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर
Nagpur many lakes disappear and some verge of extinction
Nagpur many lakes disappear and some verge of extinction

नागपूर : ऐतिहासिक तलावांचे संवर्धन करून पर्यटकांना आकर्षित करण्याऐवजी महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासने बेफिकिरीचा वारसा कायम ठेवल्याने शहरातील काही तलावांना अखेरची घरघर लागली आहे. विशेष म्हणजे महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासच नव्हे तर नागरिकांचे मौन तसेच औदासिन्यही तलावाच्या मुळावर उठल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार आहे. पर्यावरणदिनी केवळ दोन चार पत्रके वाटणे, व्याख्यान देण्यापलीकडे कुठलीही ठोस कृती होत नसल्याने काही तलाव नष्ट झाले तर काही तलावांना अतिक्रमणामुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. फुटाळा, गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात आहे, तीच शहरातील इतर तलावांबाबत का नाही, असा सवाल तलाव परिसरातील नागरिकांनीही उपस्थित केला आहे.

शहराला राजे बख्त बुलंद शहा, राजे रघुजी भोसले यांचा इतिहास आहे. शहराच्या पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी विविध भागांमध्ये तलाव बांधले. त्यांच्यानंतर इंग्रजांच्या काळातही तलाव जपले. परंतु त्यानंतर शहराचे नागरीकरण, आधुनिकीकरणात तलावाचे क्षेत्रफळ कमी होत गेले. आज संजय गांधीनगर तलाव पूर्णपणे नष्ट झाला असून त्यावर आता हुडकेश्वर पोलिस स्टेशनची इमारत आहे. लेंडी, नाईक अतिक्रमणाने गिळंकृत केले असून पांढराबोडी तलावाच्या मोठ्या क्षेत्रफळावर वस्ती वसली आहे. या तलावांना आता डबक्याचे स्वरूप आले आहे. महापालिका, नासुप्र प्रशासनाचा बेजबाबदारपणा, बिल्डर लॉबी आणि राजकीय नेत्यांतील दोस्ती या तलावांचा कर्दनकाळ ठरल्याचे दिसून येत आहे.

गेल्या २० वर्षात नागरीकरणामुळे जवळपास १२ ते १५ छोटे तलाव नष्ट झाल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. राहाटे कॉलनी ते कारागृहात भागात २००० साली दिसणारे २ छोटे तलाव २०१९ मध्ये नष्ट झाले. येथे तलाव होते, हे जुने जाणते नागरिकच सांगू शकतात, नव्या पिढीला याबाबत काहीच माहित नाही. उत्तर नागपुरातील नवी मंगळवारी तलावाचीही ओळख आज पुसली जात आहे. येथे केवळ एक डबके झाले असून हा तलाव होता, असे कुणाला सांगितल्यास विश्वास बसणार नाही.

उत्तर नागपुरातीलच नाईक व लेंडी तलावाचीही अशीच दुरवस्था आहे. लेंडी तलावात माती भरून नागरिकांनी त्यावर घरे बांधली. हा प्रकार सुरू असताना परिसरातील नगरसेवक किंवा आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले. पांढराबोडी तलावावर सव्वातीन कोटी रुपये खर्च केले. परंतु या तलावाचे ना सौंदर्यीकरण झाले ना पुनरुज्जीवन. तलावाच्या नावावर कंत्राटदार, त्या माध्यमातून स्वतःची घरे भरण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. सक्करदरा तलावाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या ऐतिहासिक तलावाची दुर्दशा झाली आहे. उर्वरित कामे एखाद्या संस्थेकडून सीएसआर फंडातून या तलावाचे काम करण्याचा पर्याय आहे. परंतु राज्य सरकारकडे निधीसाठी बोट दाखवून महापालिका हात झटकत असल्याचे दिसून येत आहे. सोनेगाव तलावाचीही हीच स्थिती आहे.

शहरालगतचे तलावही गायब

शहराला लागून असलेल्या वाडी भागात २००० साली ४ छोटे तलाव जवळजवळ होते. ते बुजविण्यात आले असून तिथे वस्ती निर्माण झाली. हिंगणा भागात असलेले ३ छोटे तलाव २००२ साली स्पष्ट दिसत आहे. माती टाकून बुजविल्याने २०१९ साली नकाशातून तलाव गायब झाल्याचे गुगल अर्थवर स्पष्ट दिसत आहे.

तलावाची सद्यःस्थिती

  • फुटाळा ः काम सुरू

  • गांधीसागर ः काम सुरू

  • राहाटे कॉलनी ः नष्ट

  • संजय गांधीनगर ः नष्ट

  • अंबाझरी ः सांडव्याला तडे

  • गोरेवाडा ः दूषित

  • सोनेगाव ः दूषित

  • नाईक तलाव ः डबके

  • लेंडी तलाव ः डबके

  • पांढराबोडी ः डबके

  • नवी मंगळवारी ः नष्ट होण्याच्या मार्गावर

  • सक्करदरा ः संथगतीने काम सुरू

  • पोलिस लाईन टाकळी ः जलपर्णी वाढली

प्रशासनाने शहराचा विकास करताना तलावाचे महत्त्व अबाधित ठेवण्याची गरज आहे. परंतु अकरा तलावांच्या विकासावर नजर ठेवणे, मार्गदर्शन करणे यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीलाच महापालिकेने न्यायालयात खेचले. अन्यथा शहरातील तलावाचा चेहरा वेगळा राहिला असता. नैसर्गिक जलस्रोतांचा ऱ्हास करणाऱ्याविरोधात कठोर धोरणाचा अवलंब करीत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तरच तलाव वाचतील.

- प्रवीण महाजन, जलअभ्यासक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com