Nagpur : ‘MBA’ सीईटीमध्ये तांत्रिक घोळ ; शेकडो विद्यार्थी वंचित Nagpur MBA CET Technical mess Hundreds of students deprived | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBA Admission

Nagpur : ‘MBA’ सीईटीमध्ये तांत्रिक घोळ ; शेकडो विद्यार्थी वंचित

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलद्वारे ‘एमबीए’ प्रवेशासाठी शनिवार (ता.२५) पासून दोन दिवस घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन सामाईक चाचणी परीक्षेच्या (सीईटी) पहिल्याच दिवशी तांत्रिक घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली. वेळ चुकल्याने अनेकांच्या परीक्षांच्या वेळा बदलल्या तर काही विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत परीक्षा होईल या आशेवर केंद्रावर बसल्याचे चित्र होते.

‘एमबीए’ सीईटीमध्ये तांत्रिक घोळ

राज्याच्या सीईटी सेलद्वारे गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शनिवार (ता.२५) आणि रविवार (ता.२६) या दोन दिवसात शहरातील १३ केंद्रावर या एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. शहरात ‘एज्युक्विटी’ या खासगी कंपनीमार्फत परीक्षेचे नियोजन करण्यात आले.

सकाळी ९ वाजता पहिले सत्र तर दुपारी दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार होती. परीक्षा ऑनलाइन असली तरी केंद्रावर पेपर सोडवायचा होता. परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली होती. परीक्षेपूर्वी नोंदणी करणे आवश्यक होते.

विद्यार्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच विद्यार्थी नोंदणीचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यात अडचणी येत होत्या. काहींची नोंदणी डबल दिसत होती. नोंदणीच न करता आल्याने अनेकांना पेपरच देता आला नाही.

पहिला पेपर सकाळी ९ चा असतानाही तांत्रिक त्रुटींमुळे सकाळी ११ वाजुनही पहिल्या सत्राचाच पेपर सुरू होऊ शकला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजू सांभाळून नेत,

परीक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यानंतरही शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयाबाहेरच तळ ठोकला होता. त्यामुळे पालकांनी परत ‘सीईटी’ घेण्याची मागणी केली आहे.

बसण्याचीही व्यवस्था नाही

नियोजनाप्रमाणे शनिवारी शहरातील विविध केंद्रावर विद्यार्थी सकाळी ८ वाजता पोहचले. ९ वाजता पेपर असल्याने तिथे गेल्यावर परीक्षेसाठी बोलाविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थ्याच्या बसण्याची सोय करण्यात आली होती.

मात्र, अतिरिक्त विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? हा प्रश्‍न निर्माण झाला. विशेष म्हणजे शहरातील रायसोनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात हजार विद्यार्थ्यांना बोलाविले असताना केवळ ८०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय पलोटी आणि जे.डी. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांच्या केंद्रावर हीच परिस्थिती होती.

तांत्रिक सुधारणा करणारेही अप्रशिक्षित

केंद्रावर तांत्रिक घोळ झाल्यानंतर यासाठी कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीकडे कुठलेही प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे असे असताना, त्यांना इतक्या मोठ्या परीक्षेचे कंत्राट कुणाच्या म्हणण्यानुसार देण्यात आले हे कळले नाही. विशेष म्हणजे, बऱ्याच केंद्रावर महाविद्यालयातील तंत्रज्ञांनी मदत केल्यावर परीक्षा घेता येणे शक्य झाले.

सर्व्हर डाऊन

सीईटीमध्ये विद्यार्थ्याना पेपर दीड तासात कॉम्प्युटर मोडवर सोडवायचा होता, मात्र, तो सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पेपर थांबले. बऱ्याच प्रयत्नानंतर सर्व्हर व्यवस्थित ठेवण्यात यश आल्याने पेपर सुरळीत झाला, त्यामुळे टायमरमध्ये बराच वेळ वाया गेला. अशा स्थितीत परीक्षार्थींना पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

संपर्क करायचा कुठे ?

सीईटीद्वारे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना थेट सीईटी कक्षाशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नाही. शनिवारी सीईटी सेलच्या वेबसाइटवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर परीक्षार्थींनी अनेकवेळा फोन केला, मात्र फोन उचलण्याची गरज कोणालाच वाटली नाही. या दिवशी परीक्षार्थींचा त्रास सुरूच होता, परंतु परीक्षा केंद्र किंवा सीईटी सेलचा कोणताही जबाबदार अधिकारी त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही.