नागपूर : मेडिकल नव्हे, बेवारस रुग्णांचे घर

आरोग्य मंदिर झाले वृद्धाश्रम
Nagpur medical patient Old age home
Nagpur medical patient Old age home

नागपूर : आज सकाळची गोष्ट...साठीतील व्यक्ती. कोणीतरी मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात आणून सोडून दिले. हातात कार्ड. डॉक्‍टरांनी त्याची अवस्था बघून तत्काळ उपचार सुरू केले. रुग्ण भरती झाला. उपचारातून बरा झाला. सुटी देण्याचा वेळ आली. मात्र त्याला येथे कोणी आणले, तो कुठून आला, याची माहितीच उपलब्ध नाही. बेवारस अवस्थेत पडून असलेल्या या रुग्णाला पोलिसांनी आणले होते. मेडिकलमध्ये अनोळखी, बेवारस, निराधार व्यक्तींवर उपचार झाल्यानंतर त्यांना पोलिसांमार्फत वृद्धाश्रमात सोडण्याची गरज आहे, परंतु पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होते.

अखेर महिना दोन महिने बेवारस रुग्ण मेडिकलच्या खाटेवर दिवस काढतात. दर महिन्याला पाच ते सात बेवारस रुग्णांवर उपचारानंतर त्यांचा मुक्काम मेडिकलमध्ये असतो. वॉर्ड हेच त्याचे घर बनते. आरोग्य मंदिर नव्हेतर बेवारस रुग्णांसाठी वृद्धाश्रम असल्याचे चित्र दिसून येते. मेडिकलच्या अस्थिव्यंगोपचार विभागात राजू किशनसिंग ठाकूर हा निराधार रुग्ण दाखल झाला. त्याच्या जखमांवर मायेची फुंकर घालून आईपेक्षाही वत्सलतेने सेवा शुश्रूषा आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. पन्नाशीतील रुग्णाचा डॉक्टर, परिचारिकांनी जीव वाचवला. रुग्ण बरा झाला. तेव्हा दोन्ही हात जोडून त्याने डॉक्टर व परिचारिकांचे आभार मानले.

त्याला स्वतःचे नातेवाईक नसल्यामुळे दोन अडीच महिने त्याचा मुक्काम मेडिकलमध्ये होता. या दरम्यान योगेश नासरे यानेही मोलाची मदत केली. अडीच महिन्यानंतर मात्र त्याला सुटी देण्यात आली. या निराधार रुग्णाचे पुढे सामाजिक संस्थेत पुनर्वसन करण्यात आले.

मिळेल ते काम करून भागवितात उपजीविका

राजू ठाकूर यांचे कोणीही जवळचे नातेवाईक अथवा कुटुंबीय नाहीत. यामुळे बरा झाल्यानंतर मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवीत असत. रात्री फुटपाथचा आश्रय घेऊन जीवन व्यतीत करत होता, उपचारादरम्यान या रुग्णास आवश्यक ती सर्व औषधी व इतर साहित्य मेडिकलच्या समाजसेवा विभागामार्फत पुरविण्यात आली. सध्या जीवनछाया नर्सिंग केअरमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

दर महिन्यात पाच ते सात निराधार, बेवारस रुग्णांना पोलिसांमार्फत दाखल करण्यात येते. मात्र उपचारातून बरे झाल्यानंतर त्या निराधार रुग्णाला नेण्यासाठी कोणीही येत नाही. अशावेळी मेडिकलच हेच त्या निराधार रुग्णाचे घर बनते. मात्र बरा झाल्यानंतर मेडिकलमधील वॉर्डात खाट उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांच्या राहण्याचा प्रश्न पुढे येतो. त्यावेळी मेडिकलच्या आवारात हे निराधार पडून असतात.

-सामाजिक सेवा विभाग, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com