
Nagpur : कर्मचाऱ्यांना खुर्चीचा ‘मोह आवरे ना’
नागपूर : मेयो असो की, मेडिकल येथे कधी काय घडेल, याचा नेम नसतो. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या दोन्ही रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहण्याच्या हट्टाला पेटले असतात. मात्र यावेळी अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास इच्छुक असतानाही त्यांना इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू होण्याचे पत्र देण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
वैद्यकीय संचालनालयाकडून अलीकडेच शंभरावर लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देत बदली करण्यात आली. या बदली होऊन महिना लोटून गेला आहे. मात्र झालेल्या बदल्यांच्या ठिकाणी मेडिकलमधील कर्मचारी अद्यापही इतर ठिकाणी रुजू झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यांना मेडिकलमध्ये खुर्चीचा मोह आहे, असे काही कर्मचारी खुर्ची सोडायला तयार नाहीत, तर अनेक कर्मचारी पदोन्नती झाल्यामुळे बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास तयार आहेत. मात्र मेडिकलचे प्रशासन या कर्मचाऱ्यांना सोडत नसल्याचे उघड झाले. यावरून शासनाच्या आदेशालाच स्थानिक प्रशासन हरताळ फासत असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे.
प्रामाणिक कर्मचाऱ्यांची व्यथा...
नांदेड, हिंगोली किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असलेले अनेक कर्मचारी मेडिकलमध्ये रुजू होतात. वर्षे दोन वर्षे लोटल्यानंतर कर्मचारी जुगाड करून हव्या असलेल्या ठिकाणी बदली करून निघून जातात. मात्र नागपुरातील काही प्रामाणिक कर्मचारी चंद्रपूर, गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्षानुवर्षे काम करत आहेत, परंतु त्यांची नागपुरात बदली होत नाही. चंद्रपूर गोंदिया हा भाग नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाते, अशी व्यथाही काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
बदली होताच लागतात जुगाडाला
अलीकडे मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र संस्थान तयार केल्याचे चित्र दिसते. बदली होताच ती ‘जुगाड'' करून रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात गुंतले आहेत. विशेष असे की बदली रद्द करण्याच्या सेटिंगमध्ये वरिष्ठ देखील सामील असल्याची जोरदार चर्चा मेडिकलमध्ये रंगली आहे.